.....आणि पहाटे पाच वाजता झाली भोंग्याला सुरुवात.
राहुरी नगरपालिका झाली 54 वर्षांची....
राहरी ( विशेष प्रतिनिधी )
राहुरी नगरपालिकेला 53 वर्ष पूर्ण होत 54 व्या वर्षात पदार्पण करत आहे ! राहुरी शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे, मात्र रस्त्यांचे भाग्य केव्हा उजळणार ? हा राहुरीकरांचा प्रश्न मात्र कायम आहे .
राहुरी नगरपालिकेचा कचरा डेपो
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका
शहराचा विस्तार उपनगरांच्या माध्यमातून वाढला . हुतात्मा स्मारक , पाण्याची तुषार उडवणारा कारंजे वाचनालय , विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका , केशर मंगल कार्यालय , शाहू महाराज सांस्कृतिक कार्यालय , राही आई हॉल , शनी मारुती मंदिर , ज्ञानेश्वर उद्यान ,आनंदऋषीची गार्डन , हरणाई उद्यान , ज्येष्ठ नागरिक योगाहॉल झाले आहे . राहुरी शहरातील कचरा संकलन करून भव्य कचरा डेपो हा राज्यातील नगरपालिकांसाठीही पथदर्शी असा ठरला आहे . एवढेच नव्हे तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेतून शहरातील पाण्याच्या टाकीजवळ भव्य , सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक राहुरीकरांचे आकर्षण बनला आहे . राहुरी बस स्थानकाचे पुनर्बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच मल्हारवाडी रस्त्या जवळ भव्य असा बंदिस्त स्विमिंग टॅंक देखील प्रगतीपथावर असून माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे , माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी कडे राहुरी शहर वाटचाल करत आहे .गेली ३०-४० वर्षे पालिकेवर तनपुरे यांची सत्ता राहिली आहे . डॉ उषा तनपुरे यांच्यानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने नगराध्यक्ष मिळाले . ते नंतर आमदार झाले, मंत्रीही झाले. राहुल शहरासाठी नगर विकास मंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी निधी आणला . आज तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे वाटचाल सुरू आहे. असे असताना शिर्डी शनी शिंगणापूर या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या राहुरी शहर व परिसराचा रस्त्यांचा विकास होणे विकास आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत .
राहुरी पालिका इतिहास पहा -
१३ जानेवारीला राहुरीकरांना पालिका 54 व्या वर्षात पदार्पण करताना आनंद द्विगुणित होत आहे . 53 वर्षांपूर्वी १३ जानेवारी १९७२ रोजी जिल्ह्यातील पहिली क वर्ग पालिका राहुरी शहरात स्थापन झाली . त्यापूर्वी राहुरी ग्रामपंचायत अस्तित्वात होती . शहराचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे , यासाठी राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉ . दादासाहेब तनपुरे यांनी तत्कालीन मंत्री राजाराम बापू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता . त्यानंतर राहुरी शहराला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला होता . पालिकेचा स्थापनादिन म्हणून राहुरी पालिकेचा भोंगा वाजवून मध्यरात्री शहरात फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देण्यात आली . सिव्हिल जज कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक बारवकर , तहसीलदार बी . डी . वर्पे , पहिले मुख्याधिकारी के . एन . भोंजाळ , जुन्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व पहिले नगराध्यक्ष ल . रा . तथा लालाशेठ बिहाणी , उपनगराध्यक्ष कृष्णाजी भुजाडी पाटील यांच्या साक्षीने पालिकेची स्थापना करण्यात आली होती . त्या दिवसापासून पहाटेच्या पाच वाजता आणि रात्रीच्या साडेआठ वाजता भोंगा वाजवण्यास प्रारंभ झाला . याच ठिकाणी नवीन पालिकेची भव्य इमारत ५ जून २०११ ला अस्तित्वात आली .
राहुरी शहर - स्मार्ट सिटी
स्पर्धा परीक्षांसाठी च्या विद्यार्थ्यांसाठी माहेरघर
राहुरी शहर व परिसरात विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा साठी अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मोठ्या प्रमाणात असून महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अनेक अनिवासी विद्यार्थ्यांना ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मार्गदर्शक ठरत आहेत. एकेकाळी कुस्तीच्या आखाड्यासाठी प्रसिद्ध असणारे राहुरी आता खरंच बदलत चाललंय ! विविध कला व क्रीडा प्रकारांचे मार्गदर्शक केंद्र बनत जात असल्याने राहुरीची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे .
एकेकाळी महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांनी आपली कारकीर्द गाजवत राहुरीचे नाव गाजवले होते .
पोलीस , लष्कर आणि विविध पदांसाठी तयारी करणाऱ्या हेल्थ अकॅडमी देखील कार्यरत आहेत . अलीकडच्या काळात बॉल बॅडमिंटन , हॉलीबॉल , बॅडमिंटन , बास्केटबॉल , कराटे , स्केटिंग , रायफल शूटिंग ,तायक्वान दो , किक बॉक्सिंग , लगोरी क्रीडा प्रकार अशा विविध प्रकारांचे विद्यार्थी व पालक वर्गात आकर्षण बनत चालले आहे .
ठिकठिकाणी या क्रीडा प्रकारातील विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन विविध राज्य पातळी व देश पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश मिळवत आहेत . राहुरी शहरात पूर्वी दोन ते तीन कुस्त्यांची तालीम होत्या .या ठिकाणी कुस्तीगीर तालीम करायचे . आज राहुरी मध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण खाजगीरित्या दिले जात आहे आणि त्याला प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. एवढेच काय शास्त्रीय संगीताचे आणि अत्याधुनिक कोरिओ संगीत क्लासेस देखील सुरू झालेले आहेत . राहुरी नगरपालिकेने राहुरी नगरपालिका कार्यालय , शनी मारुती मंदिर चौक , अग्निशामक केंद्र चौक या ठिकाणी स्मार्ट राहुरी सिटी चे आकर्षक डिजिटल बोर्ड लावला आहे. पाण्याच्या टाकीजवळ एक किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक ते काम देखील प्रगतीपथावर आहे . या सर्व प्रकारांमुळे राहुरी नक्कीच स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे .




Post a Comment
0 Comments