होय ! आम्ही पहिलीचेच विद्यार्थी
सात्रळ सुनील सात्रळकर
राहुरी तालुक्यातील सोनगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती (धानोरे) ही आय एस ओ मानांकित सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतलेली एक आदर्श शाळा आहे .
या शाळेमध्ये १०किलोमीटर अंतरावरून सुमारे सात ते आठ गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेमध्ये एकूण २०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये फक्त ५५ते ६० विद्यार्थी धानोरे गावचे आहेत. मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे, राजेंद्र बोकंद, विद्याताई उदावंत, सुनिता ताजणे,मनिषा शिंदे,सोमनाथ अनाप व सरगम दिघे हे शिक्षक कार्यरत आहेत.सतत नाविन्याचा ध्यास घेतलेले उपक्रमशिल मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवित आहेत.
शाळेने यापूर्वी राज्य, राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेले आहे.विविध गुणदर्शन स्पर्धेत सलग २८वर्षांपासून तालुका, जिल्हास्तरावर विद्यार्थी चमकत आहेत.शाळेने ISO मानांकन, गुणवत्ता विकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रथम,स्वच्छ सुंदर शाळा पारितोषिक, ग्रामीण भागातील आदर्श शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांक, राज्यस्तरावरील MIEPA संस्थेच्या *गौरव गाथा* पुस्तिकेत प्रथम पानावर स्थान मिळवले आहे.शाळेतील शिक्षकांनीही तालुका,जिल्हा व राज्य शिक्षक पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अवघे सहा महिने झाले आहेत.
पहिली मधील विद्यार्थी मुळाक्षरे, स्वरचिन्हांच्या बाराखड्या , संख्याज्ञानाचे धडे गिरवत आहेत.
या शाळेतील शिवदीप दिपक काळे, ओजस्वी सोमनाथ अनाप,विहान ऋषिकेश भांबरे व शिवांश गणेश वाघचौरे हे विद्यार्थी मात्र याला अपवाद ठरले आहेत.
स्वच्छ,प्रश्न, उत्तर,इंद्र, धनुष्य, सूर्य, गर्व,गृह,मातृ,सृष्टी, दृष्ट, महेंद्र,नृप,राष्ट्रध्वज , आक्रोश, डॉक्टर,मुद्दल, गणेशोत्सव,मुद्दल, नैवेद्य विद्युत ,बुद्धिमत्ता, स्त्रोत,मॅट, पॅकिंग , तीर्थक्षेत्र, क्षुल्लक, राष्ट्रीय, पौर्णिमा, साक्षात्कार,प्रतिज्ञा, धृतराष्ट्र, स्वतंत्र,ध्रुव,पर्वत,दृढ,कृपा,गोष्ट, पृथ्वी,कृष्ण,मर्द इ.अवघड शब्दांचे वाचन ते अचूकपणे करत आहेत.एवढेच नव्हे तर त्यांनी१५पर्यंत बिनचूक पाढे पाठ केलेले आहेत.
अनोख्या बुद्धिमत्तेच्या चुणूक बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
शाळेने घेतलेल्या गगनभरारी मध्ये सक्रीय शाळा व्यवस्थापन समिती, दानशूर पालक,ग्रामस्थ व अधिकारी वर्गाचाही मोलाचा वाटा आहे.

Post a Comment
0 Comments