यंदाच्या राष्ट्रीय मानांकनात राहुरी कृषी विद्यापीठाचे नाव नाही ; पदवीदान समारंभही पुढे ढकलला !! जोरदार चर्चा
सतर्क खबरबात टीम - विशेष वृत्त
नेहमीच चर्चेत असलेल्या राहुरीच्या कृषी विद्यापीठाचे यंदा राष्ट्रीय मानांकनात नाव नसल्याने शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे .
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या 'राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था' (एनआयआरएफ) यांनी २०२४ वर्षाची मानांकन यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यात देशातील दर्जेदार व गुणवत्ताप्रधान अशा ४० कृषी विद्यापीठांचा समावेश केला आहे. देशातील सर्वाधिक कृषी महाविद्यालये असलेल्या महाराष्ट्रातील एकही कृषी विद्यापीठ या मानांकन यादीत नाही , हे विशेष आहे.
मानांकनात पहिल्या पाच विद्यापीठांमध्ये इंडियन अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (दिल्ली), आयसीएआर-नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (कर्नाल), पंजाब अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूट (लुधियाना), बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (वाराणशी) व बरेलीमधील इंडियन व्हेर्टनरी रिसर्च इन्स्टिट्यूटचा समावेश आहे.
राज्यात पाच विद्यापीठ आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात कृषी शिक्षण , संशोधन व विस्तार याचे काम चालते . यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, (दापोली), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) तसेच नागपूरच्या पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा समावेश होतो.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला राज्यात एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे . गेल्या अलीकडच्या काळात या ना त्या कारणाने कृषी विद्यापीठाचे नाव लौकिकाला नक्कीच खोडा बसलेला आहे . त्यात कृषी विद्यापीठाच्या कारभारामध्ये अधिकारी स्तरावर मत भिन्नता व अंतर्गत वाद अनेक वेळा चावाट्यावर आलेले आहेत . तसेच राजकीय महत्त्वकांक्षांमुळे विद्यापीठात अधिकारी स्तरावर अनेक बाबींवर गंडांतर देखील आल्याचे चर्चिले गेलेले आहे .
विद्यापीठाने पदवीदान समारंभ पुढे ढकलला
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ दर दोन वर्षांनी होतो , त्याला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे . पदवीदान समारंभात महामहिम राज्यपाल महोदय , राज्याचे कृषिमंत्री , राज्यमंत्री , विद्यापीठाचे कुलगुरू , प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत पदवी उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येते . यंदाच्या वर्षी कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान समारंभ येत्या 28 जानेवारीला मोठ्या थाटात संपन्न होणार होता . मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे हा परिवहन समारंभ पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर निवेदन नुकतेच विद्यापीठाचे कुलसचिव नितीन दानवले यांनी केले आहे . त्यामुळे ही अपरिहार्य अशी कारणे शोधली जात आहेत .
कृषी विद्यापीठाचा लौकिक जरी चांगला असला तरी अधिकारी स्तरावर तो घटल्याचे दिसत आहे. मागील वर्षी 'एनआयआरएफ'च्या २०२३ मधील मानांकन यादीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ३६ वा क्रमांक मिळाला होता. यंदाच्या मानांकनात कृषी विद्यापीठाचे नाव नसल्याने कृषी विद्यापीठ वर्तुळात तसेच शेतकरी राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे .



Post a Comment
0 Comments