Type Here to Get Search Results !

बँकेत बनावट सोने ठेवून लाखोंची फसवणूक गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा ; तीन अटकेत

बँकेत बनावट सोने ठेवून लाखोंची फसवणूक : गोल्ड व्हॅल्युअरसह 4 जणांवर गुन्हा ; तीन अटकेत


 जामखेड येथील कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून 17 लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युअरसह 4 जणांवर गुन्हा : तीन जणांना अटक

सतर्क खबरबात जिल्ह्याची  - विशेष वृत्त

जामखेड येथील कॅनरा बँकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून त्या बनावट सोन्याच्या आधारे १७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केल्या प्रकरणी जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात जामखेड पोलीसांना अटक करण्यात यश आले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत कॅनरा बँकेचे जामखेड शाखेचे मॅनेजर आनंद बाबासाहेब डोळसे (वय ३०) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कॅनरा बँकत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्याची प्रत्येकी तीन महिन्याला क्षेत्रिय कार्यालय जि. नाशिक यांचे मार्फत गोल्ड व्हॅल्युअर नियुक्त करून क्वॉलीटी तपासणी केली जाते. त्यानुसार कॅनरा बँकेचे क्षेत्रिय कार्यालय नाशिक यांचे मार्फतीने गोल्ड व्हॅल्युअर म्हणुन जगन्नाथ सोनार हे तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिण्याची क्वॉलीटी तपासणी करीता आले होते .

त्यावेळी त्यांचे निदर्शनास आले की, आमचे बँकेतील तारण ठेवलेले सोन्याच्या दागिण्यांपैकी काही खातेदारांचे दागिणे बनावट असल्याचे दिसुन आले.


कॅनरा बँकेच्या शाखेत ३ सप्टेंबर २०१८ पासून गोल्ड व्हॅल्युअर म्हणून आण्णासाहेब नामदेव कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, बीड कॉर्नर जामखेड जि. अहिल्यानगर) कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या गोल्ड व्हॅल्युनुसार कॅनरा बैंक जामखेड शाखेतील खातेदार मनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी, जामखेड) यांनी दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी बँकेत येऊन सोन्याच्या ४ नग बांगड्या, ४ नग सोन्याच्या अंगठ्या, असे एकूण १०० ग्रॅम सोने असे एकूण ५ लाख, ८४ हजार ३७५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यांनी बँक शाखेतून ४ लाख ५५ हजार रुपये मुनावर अजीम खान पठाण यांच्या कर्ज खाते बँकेने जमा केलेली रक्कम खातेदार यांनी काढून घेतलेली आहे.

दुसरे खातेदार महिला अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ जामखेड यांनी २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बँकेत येऊन सोन्याच्या २ नग बांगड्या, ५ नग अंगठ्चा, असे ८ लाख ६१ हजार ५५ रुपयांचे सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवून त्यांनी बैंक शाखेतून ६ लाख ७० हजार रुपये उचलले. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी बँक खातेदार दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड, जामखेड) याने २ नग बांगड्या, १ नग सोन्याचे कडे, १ नग ब्रेसलेट, २ नग सोन्याच्या अंगठ्या असे ८ लाख ५३ हजार सोन्याचे दागिने तारण ठेवून बँक शाखेतून ६ लाख ४८ हजार रुपये उचलले.

कॅनरा बँकेचे क्षेत्रीय कार्यालय नाशिक यांचे मार्फत गोल्ड व्हॅल्युअर म्हणून जगन्नाथ रामदार सोनार यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची तपासणी केली. त्यावेळी सदरचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यानुसार बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे, मुनावर पठाण, डिगांबर आजबे व महिला अनिता जमदाडे यांनी संगनमत करून बँकेची १७ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याने त्यांच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुनावर खान, दिगंबर आजबे, अण्णासाहेब कोल्हे या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.

दरम्यान , नगर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका , खाजगी वित्तीय संस्था तसेच सहकारी बँका , पतसंस्था , क्रेडिट सोसायटी यांचे मोठ्या प्रमाणात सोन तारण व्यवहार केले जातात .मात्र कमी अधिक व्याजदर लावून या बँका व संस्थांना नफा होत असतानाही केवळ  सराफांना त्यांचे मानधन , कमिशन , मेहनताना द्यावे लागत असल्याने अनेक संस्था दर तीन किंवा सहा महिन्याला सोने तारण व्यवहार व्यवहारांची फेर तपासणी व पडताळणी करीत नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे . विशेषतः बँकांचे सल्लागार , सहकार विभाग यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचेही बोलले जात आहे .

Post a Comment

0 Comments