आधीच खड्डे व ट्रॅफिकने राहुरीकर हैराण : त्यातच महामार्ग होणार सहा पदरी डोकेदुखी वाढणार
राहुरी ( प्रतिनिधी )
एकीकडे नगर मनमाड रस्त्याचे खड्ड्यांचे साम्राज्य , वाहतुकीचा खोळंबा , मोठे ट्राफिक जाम अशा समस्यांनी वाहन चालक व नागरिक त्रस्त असताना नाशिक कुंभमेळ्यासाठी आता हाच राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी , तर सोनई फाटा ते खरवंडी फाटा चार पदरी होणार आहे . त्यामुळे राहुरीकरांची आणखी डोकेदुखी वाढणार आहे.
नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात आला.
कुंभमेळा साठी भाविकांची वाढती होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन व सर्वसंबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
श्री क्षेत्र शिर्डी आणि धार्मिक क्षेत्र शनिशिंगणापूर यांना जोडणारा दुवा म्हणजे राहुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 . गेल्या अनेक वर्षांपासून या नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे . अक्षरशः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत खंत व्यक्त केली होती . 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळा होत आहे . या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचललेली आहेत . त्यातच आता नाशिक येथील बैठकीत सावळी विहीर समृद्धी इंटरचेंज ते शिर्डी व शिर्डी ते शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द ) हा 55 किलोमीटर मार्ग आता सहा पदरी होणार आहे .
तसेच शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द ) ते शनिशिंगणापूर जवळील अहिल्यानगर संभाजीनगर रस्ता ( खरवंडी फाटा ) हा 42 किलोमीटरचा महामार्ग देखील चार पदरी होणार आहे . त्यामुळे राहुरीकरांची निश्चितच डोकेदुखी वाढणार आहे .

Post a Comment
0 Comments