राहुरीकरांना खुशखबर !! राहुरीतील खड्डेमय अशा या सहा रस्त्यांचे होणार काम ; संबंधित विभागाकडून निविदा जाहीर
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी म्हटलं की , खड्ड्यांचे व ट्रॅफिक जामचे शहर अशी प्रतिमा झालेली आहे . सांडपाणी योजनेच्या कामामुळे शहर व परिसरात तसेच नगर मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून याचा मानसिक , शारीरिक त्रास राहुरीकर सहन करीत आहेत .
राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे आणि नगर अभियंता पराग दराडे यांनी रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे .
बहुचर्चित अशा राहुरी न्यायालयाजवळील जॉगिंग ट्रॅक लगत नगर मनमाड हायवे ते संत महिपती महाराज चौक ( मल्हारवाडी रस्ता ) पर्यंत एक किलोमीटरच्या रस्ता डांबरीकरणाची निविदा नुकतीच जाहीर केली आहे .
57 लाख 90 हजार रुपये किमतीच्या कामाची निविदा असून दहा महिन्यात काम करावयाचे आहे .
पाण्याच्या टाकी पासून मल्हारवाडी रस्त्यापर्यंत राहुरी न्यायालयात शेजारील हा रस्ता धोकेदायक व त्रासदायक बनला होता . मात्र मात्र आता या रस्त्याचे भाग्य लवकरच उजळण्याची चिन्हे आहेत .
सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगरच्या कार्यकारी अभियंता यांनी नुकतीच एक निविदा जाहीर केली असून त्यात राहुरी शहरातील पाच रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे .
86 लाख 31 हजार रुपये किमतीचा कामांमध्ये एस आर हॉटेल ते रवींद्र घाडगे घरापर्यंत चा रस्ता डांबरीकरण करणे , शुक्लेश्वर चौक ते कानिफनाथ चौक काँक्रिटीकरण करणे , नवी पेठ मधील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील रस्ता डांबरीकरण करणे , नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर चौक रस्ता डांबरीकरण करणे , तसेच संत महिपती महाराज चौक मल्हारवाडी रस्ता ते भुजाडी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे , अशा कामांचा समावेश आहे . मोठ्या कालखंडानंतर राहुरी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी एकाच वेळी राहुरी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढल्याने राहुरी शहरात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे .
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था , पालिका - महापालिकांवर प्रशासक राज असल्याने अनेक विकास कामांना जणू खीळ बसल्याचे चित्र आहे . राज्यात नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस - शिंदे - पवार शासनाने सुरुवातीला शंभर दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता . प्रलंबित कामांचा निपटारा विविध खात्यांना देण्याचे आदेश दिले होते . यातील अनेक कामांचा निपटारा झाला , मात्र प्रशासनाच्या ढीलाईमुळे अनेक काम प्रलंबितच राहिलेली आहे . अशातच सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे आणि आता शासनाचे विविध विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे .
राहुरी शहरातील अनेक रस्त्यांच्या कामाला मुहूर्त मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण नसले तरी याची सध्या तरी चर्चा सुरू आहे .




Post a Comment
0 Comments