Type Here to Get Search Results !

छोट्या-मोठ्या मिरवणुका , महापुरुषांच्या जयंती अथवा उत्सव लग्नसमारंभात डीजे न वाजविण्याचा ठराव

छोट्या-मोठ्या मिरवणुका , महापुरुषांच्या जयंती अथवा उत्सव लग्नसमारंभात डीजे न वाजविण्याचा ठराव



राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी शहरात या पुढील काळात कोणत्याही छोट्या-मोठ्या मिरवणुका असो व महापुरुषांच्या जयंती अथवा उत्सव लग्न समारंभ असो , यासाठी डीजे वाजविण्यात येऊ नये. डीजे वाजविणाऱ्या विरुद्ध तातडीने पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत.

 

असा ठराव राहुरी शहरातील व्यापारी , नागरिक ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, रावसाहेब (चाचा) तनपुरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.      


शहरात एकूण सात ते आठ मंगल कार्यालय आहेत. दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रम, लग्न तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावेळेसही मोठ्या प्रमाणात डीजे वाजल्याने परिसरातील रहिवाशांना राहणे मुश्किल झाले आहे.



यातून शालेय विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत असून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांवर विशेष परिणाम होत आहेत. शहरा बाहेरील नागरिक या कार्यालयात येऊन विवाह करतात, कार्यक्रम करतात व त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. 

यासाठी कार्यालयांनी ही डीजे बाबत नियम करून अश्या कार्यक्रम आयोजकांना सक्त सूचना द्याव्यात. अशी सूचना कार्यालय मालकांनाही करण्यात येणार आहे.

 लवकरच यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते संघटना व राहुरीतील नागरिक, गणपती मंडळाचे कार्यकर्ते यांची एक बैठक घेऊन चर्चा घडविण्यात येण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशन मार्फत  पितृ पंधरावडा संपण्यापूर्वी ही बैठक घेण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.

राहुरीतील वाहतुकीलाही शिस्त लागण्यासाठी नवी पेठ व इतर भागात पांढरे आडवे पट्टे मारूनही जर इतर ठिकाणी पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राहुरी शहर पहिल्यापासून शांत असून जाती भेद कधीही नव्हता व नाही परंतु गेल्या चार वर्षात शहराला वेगळे वळण लागू पाहत आहे. तरी यासाठी आपणच आपले शहर पूर्वी सारखेच शांत कसे राहील, सगळे गोण्या गोविंदाने कसे राहतील. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.

या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नंदकुमार तनपुरे, कांता तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, दशरथ पोपळघट, सागर तनपुरे, गजानन सातभाई, विलास तरवडे, नवनीत दरक, अनिल भट्टड, महेश उदावंत, संतोष आघाव, संतोष लोढा, दिपक साळवे, निलेश जगधने, वाय एस तनपुरे, भास्कर आल्हाट सह पत्रकार उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments