Type Here to Get Search Results !

नगरचे सुधीर फडके : अरुणराव धर्माधिकारी ; शताब्दी : संघ संस्कारांची ( 6 )

 🚩🚩🚩

नगरचे सुधीर फडके : अरुणराव धर्माधिकारी ; शताब्दी : संघ संस्कारांची ( 6 )



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष लेखमाला

मागील महिन्यात नगर येथे ’ परीसवेध ’ या राजाभाऊ मुळेंनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी अनेक जुने, ज्येष्ठ स्वयंसेवक भेटले . त्यात अतिशय थकलेले, विकलांग अवस्थेतील अरुणराव धर्माधिकारीही आवर्जून आले होते . त्यांना भेटल्यावर साठ पासष्ठ वर्षांच्या आठवणी जाग्या झाल्या. अरुणराव आमच्या प्रभाकाकांचे जिवलग मित्र आणि अरुणरावांचे वडील वेद शास्त्र संपन्न सिद्धेश्वर शास्त्री तथा शिदूकाका आणि माझे वडील हे जिवलग मित्र . पण अरुणरावांच्या जवळ मी गेलो ते संघगीतांमुळे. माझा आवाज चांगला नाही, मला संगिताची जाण नाही तरीही शाखेवर, उत्सवात गरज म्हणून , वासरात लंगडी गाय म्हणून पद्य सांगण्याची हौस मला भागवायला मिळायची. अगदी वयाची सत्तरी उलटली तरीही ही संधी मिळते आहे .



अरुणरावांचा आवाज सुधीर फडकेंसारखा गोड आहे . गंमतीने आम्ही गालीबच्या स्टाईलने म्हणतो, ’ संघने निकम्मा कर दिया, नही तो अरुणराव भी थे कुछ कामके ’. त्यांचे गीत रामायण मी ऐकले आहे . सुमारे साठ वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:च्या लग्नात स्वत: म्हटलेले, ’ तुझे रुप चित्ती राहो ...’ मला आजही जसेच्या तसे आठवते आहे . 


तर असे अरुणराव आम्हाला म्हणजे कोपरगावचे मुकुंद काळकुंद्री, नगरचे राम कुलकर्णी, मी, अजित पंडीत, महेंद्रभाई चंदे,नेवाशाचे अनंतराव नळकांडे इत्यादिंना कधीतरी संघ कार्यालयात अथवा घरी बाजूला घेऊन पद्यांच्या चाली शिकवायचे. त्यांच्यासारखे जमले नाही तरी आम्ही प्रयत्न करीत रहायचो . 


त्यांनी म्हणावयास शिकवलेले ’संपूर्ण वंदेमातरम ’ , मी आजही पूजा करताना रोज म्हणतो. विशेष कार्यक्रमात, कोणी सुचविले तर म्हणण्याची संधी सोडत नाही. शिबीरात युद्धाचा खेळ झाल्यावर अरूणरावांचे ’ रणी फडकती लाख्खो झेंडे ’ संघस्थानावर चैतन्य पसरवायचे. 


अरुणरावांच्या आवाजातील ’ चला निघूया सरसावोनी ’ आणि ’ रक्षणार्थ ठाकुनी उभे चहुकडे ’ ही गीते नगरच्या नगरपालिकेने ध्वनीमुद्रीत केली होती आणि रोज नेहरु मार्केटवरील स्पीकरवर लावली जायची. यात कोरसमध्ये आमचा आवाज असल्यामुळे अरुणरावांपेक्षा आम्हीच शाइनिंग मारायचो. 


संघाच्या सहा उत्सवांसाठी अरुणराव आधीच पद्ये निवडून ठेवायचे आणि आमची तयारी करुन घ्यायचे.

’ करी बांधूया पवित्र कंकण ’

’ गुरु वंद्य महान ’

’सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात ’

’ हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश ’


’ हा विराट पुरुषा, तुझाच जय-जयकार ’, 

आज अरुणरावांना मुजरा करण्यासाठी म्हटलेले 

’ की दीप ज्योतीने सुर्या ओवाळावे ’

अशी कितीतरी पद्ये अरुणरावांनी आमच्याकडून तयार करवून घेतली होती. आत्ता लेखन करताना सगळीच पद्ये आठवत नाहीत पण, पद्यांमधील गेयता शिकवून, जुन्या काळातील हजारो स्वयंसेवकांच्या ओठी येणार्या, गुणगुणल्या जाणार्या पद्यांमुळे राष्ट्रभक्तीची स्फुल्लिंगे चेतवत ठेवण्याचे महान कार्य अरुणरावांनी केलेले आहे. 

 अरुणरावांचे वय आहे पंच्याऐंशी वर्षे. आज ते शरीराने थकलेले असले तरी मनाने खचलेले नाहीत. अलिकडची दोनतीन वर्षे सोडता, अरुणरावांची पद्ये ऐकण्याचे व त्यांच्याकडून शिकण्याचे भाग्य मला लाभले आहे . आता मला रोज शाखेत पद्ये सांगावी लागत नसली तरी, नातवंडे मांडीवर बसली की मला संघाच्या गीतांशिवाय दुसरी गाणी म्हणताच येत नाहीत. माझ्या नातवंडांनाही ती आवडतात आणि याचे श्रेय आहे अरुणराव धर्माधिकारी यांना ! अरुणराव शत-शत नमन ।

वंदे मातरम् ।

आबा मुळे , नेवासा .

9 आक्टोबर 2025

Post a Comment

0 Comments