कृषी विद्यापीठातील नोकरीचा प्रश्न तापला ! प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास १७ ऑक्टोबरपासून 'विजय तमनर' यांचा आमरण उपोषणचा इशारा
राहुरी ( प्रतिनिधी )
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी येथे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या १७ ऑक्टोबर २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
कृषिमंत्र्यांचे आश्वासन; तरीही आंदोलनावर ठाम.
या प्रकरणाच्या अनुषंगाने विजय तमनर यांनी आज मुंबई येथे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. मंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी, विद्यापीठाचा मागील अनुभव पाहता, तमनर यांनी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी, २९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी कृषिमंत्री भरणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच विद्यापीठाचे कुलगुरू आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होते.
दोन मुख्य मागण्यांवर उपोषणाचा पवित्रा.
विजय तमनर यांनी विद्यापीठ प्रशासनासमोर खालील दोन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दिली आहे:
वर्ग चार संवर्ग: प्रकल्पग्रस्तांच्या विशेष भरती मोहिमेअंतर्गत जाहीर झालेल्या निवड यादीतील उमेदवारांना त्वरित नियुक्ती आदेश देण्यात यावेत.
वर्ग तीन संवर्ग: वर्ग तीन संवर्गातील उमेदवारांच्या भरतीसाठी त्वरित परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे.
या मागण्या पूर्ण न झाल्यास, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी विजय तमनर हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर स्वतः आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्यापीठ प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments