राहुरीत 12 प्रभागात 38 मतदान केंद्र ; तिसऱ्या दिवसापर्यंत एकही अर्ज दाखल नाही
राहुरी ( प्रतिनिधी )
[ निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव ]
राहुरी नगरपालिका निवडणूकीसाठी बारा प्रभागात 38 मतदान केंद्रांवर 150 कर्मचारी व 50 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून तिसऱ्या दिवशी बुधवारपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता .
दरम्यान , आचारसंहिता काळात नियमांचे पालन करून मतदानाचा टक्का वाढवा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी- श्री. अनुपसिंह यादव यांनी केले आहे .
राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असुन, दरम्यान, निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन झाला आहे.
आचारसंहिता काळात नियमांचे पालन करा, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निवडणूक अधिकारी श्री. अनुपसिंह यादव, तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नामदेव पाटील, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अभिजित हराळे यांनी दिली.
राहुरी नगरपरिषद निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार आहे . अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना ११ प्रकारची कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. शपथपत्र, मतदारयादीतील क्रमांकाची प्रत, बँक पासबुक छायाप्रत, अनामत रकमेची पावती, घोषणापत्र, अपत्याबाबत स्वयंघोषणा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे नोटरीकृत प्रमाणपत्र, राखीव जागेसाठी जात वैधता प्रमाणपत्र, निवडणूक खर्चाबाबत हमीपत्र व नगपंचायत थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र यांचा यामध्ये समावेश आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करताना केवळ प्रतिनिधी व सूचक यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी, पक्षाच्या उमेदवाराला एक, तर अमान्यताप्राप्त पक्ष किंवा अपक्ष उमेदवाराला पाच सूचक आवश्यक आहेत. सूचक संबंधित प्रभागातील मतदार असणे आवश्यक आहे. एक सूचक एकाच उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करू शकतो; अन्यथा पहिला अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.
राहुरी शहरातील १२ प्रभागामध्ये पुरेशा प्रमाणात अतिरिक्त मतदान केंद्र उभारण्यात आली आहे त्यामुळे शहरात मतदारांना या सुविधेमुळे जास्त त्रास होणार नाही. शहरातील एकूण ३८ मतदान केंद्रासाठी एकुण १५० कर्मचारी व ५० अधिकारी नेमेलेले आहेत. नामनिर्देशनपत्रासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापला आहे. मतदान केंद्रांसह विविध पथकांसाठी त्यांना जबाबदारी ठरवून दिली आहे. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांच्या दि. २९ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशनुसार क वर्ग नगरपरिषदसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा ७.५० लाख आहे, तर नगसेवकपदासाठी २.५० लाख आहे. यापेक्षा जास्त खर्च झाल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाणार जाईल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा राहुरी नगरपरिषद कार्यालय, बिल्डींग, दुसऱ्या मजल्यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, यासाठी कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारानी दि. १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दुपारी ३.०० वाजेपर्यंत उमेवारी अर्ज दाखल करावा. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ तीन व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारासाठी सुविधा देण्यात येणार आहे, मागील तीन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांनी दिली.



Post a Comment
0 Comments