Type Here to Get Search Results !

या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राज्यपालांनी केली निवड ; पहा बातमीत

या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राज्यपालांनी केली निवड ; पहा बातमीत



डॉ. विलास खर्चे यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड



राहुरी कृषी विद्यापीठ ( प्रतिनिधी )

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विलास काशिनाथराव खर्चे यांची मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी निवड केली आहे.



 कुलगुरूपदी निवड होण्याआधी ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे संशोधन संचालक म्हणून 2017 पासून कार्यरत होते. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि ICAR- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर येथे मृदाशास्त्रात (भूमी संसाधन व्यवस्थापन) पीएच.डी. पूर्ण केली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीची जाहिरात त्रिसदस्यीय निवड समितीने दि. 12 ऑगस्ट, 2025 रोजी प्रसिध्द करुन दि. 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत अर्जाची मागणी केली होती. निवड समितीने आलेल्या अर्जातून 12 जणांची मुलाखत घेवून अंतिम पाच नावे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठविली होती. या अंतिम पाच जणांची मा. राज्यपाल महोदयांनी मुलाखत घेवून डॉ. विलास खर्चे यांची निवड कुलगुरुपदी केली.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये डॉ. विलास खर्चे यांनी नऊ वर्ष विविध पदांवर सेवा दिलेली आहे. त्यात मायक्रोन्यूट्रिएंट संशोधन प्रकल्पाचे प्रमुख, ICAR-AICRP-STCR प्रकल्प, सह प्राध्यापक, NATP नोडल अधिकारी आणि नियोजन अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नंतर त्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यांनी अकोला कृषि विद्यापीठात विविध पदांवर काम करून आपला ठसा उमटवला आहे. यात मृदाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, नागपूर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि नोव्हेंबर 2017 पासून विद्यापीठाचे संशोधन संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्याकडे अधिष्ठाता (कृषि) चा पदभार दीड वर्ष होता. आत्तापर्यंत त्यांनी दोन्ही विद्यापीठांमध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तारामध्ये 30 वर्षाची प्रदीर्घ सेवा दिलेली आहे. मृदाशास्त्र, भूमी संसाधन व्यवस्थापन, पेडोलॉजी, मृदा गुणवत्ता व आरोग्य, तसेच क्षारपड जमिनांचे व्यवस्थापन या विषयांमध्ये त्यांनी त्यांचा संशोधनाचा ठसा उमटवला आहे.

 डॉ. खर्चे यांनी मृदा व एकात्मिक खत व्यवस्थापन यावर महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी शाश्वत शेतीसाठी उपयोगी ठरलेले असे संशोधन केले आहे. त्यांनी दीर्घकालीन मृदा गुणवत्तेतील बदल, संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षारपड जमिन सुधारणा याबाबतीत महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांचे आत्तापर्यंत 123 संशोधन लेख, 166 विस्तार लेख आणि 53 पुस्तके/संशोधन पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी मृदा आरोग्य व्यवस्थापन, समस्या असलेल्या जमिनींसाठी आणि पिकांच्या एकात्मिक खत व्यवस्थापनावर अनेक तंत्रज्ञान शिफारसी दिल्या आहेत. ते 2017 पासून अकोला विद्यापीठाचे मोठे संशोधन प्रकल्प यशस्वीपणे, आयोजन, नियोजन आणि देखरेख करीत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पीक वाण, पीक उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारशी विकसित केल्या आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर संशोधनासाठी सामंजस्य करार घडवून आणले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 10 पीएच.डी., तसेच 24 M.Sc. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ते विविध शैक्षणिक आणि संशोधन प्रकल्पांचे प्रमुख होते आणि काही बाह्य अनुदानित प्रकल्पही पूर्ण केले आहेत.

 डॉ. खर्चे यांना कृषि क्षेत्रातील शेतकरीभिमुख संशोधन प्रकल्प मिळविणे व त्यांची अंमलबजावणी करणे याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि पिकांच्या खत व्यवस्थापनावर धोरणात्मक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ते विविध राष्ट्रीय शैक्षणिक व तांत्रिक समित्यांवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील जर्नल्सचे संपादक म्हणूनही काम करत आहेत. त्यांनी मृदा गुणवत्ता, एकात्मिक खत व्यवस्थापन, GIS तंत्रज्ञानाचा वापर करून मृदा आरोग्य मापन आणि खराब जमिनींच्या सुधारणा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. ते महाराष्ट्र विज्ञान अकादमी, पुणे आणि इंडियन सोसायटी ऑफ सॉईल सर्व्हे अॅण्ड लँड युज प्लॅनिंग संस्थेचे फेलो आहेत. त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि शेतकरीभिमुख कार्यामुळे त्यांची राज्याचे मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments