बिबट्यांच्या वाढत्या हल्यांबाबत तनपुरे आक्रमक ; लाखो शेतकरी मोदींना पाठवणार पत्र
बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे कायदा बदलण्याची प्राजक्त तनपुरे यांची मागणी !
सरकार जनतेसाठी काम करते की बिबट्यासाठी ?
प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून झाली सुरुवात !
राहुरी ( प्रतिनिधी )
सध्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून बिबट्यांची दहशत आता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालीअसून ग्रामीण भाग अक्षरशः भयग्रस्त झाला आहे. बिबट्याच्या दहशतीपायी ग्रामीण भागात सायंकाळी पाच
वाजेनंतर अक्षरशः शुकशुकाट पसरलेला असतो. गावागावांत, वाड्यावस्त्यांवर बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून लहान मुले, शेतकरी व नागरिकांवर हल्ल्यांच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काळात अनेक लहान बालकांसह नागरिकांचे निष्पापांचे व पाळीव प्राण्यांचे प्राण गेले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने राहुरीतून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच्या वतिने पत्रांची मोहिम राबविण्यात सुरुवात झाली असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची सुरवात त्यांच्या कार्यालयातुन केली आहे.
बिबट्या आता ग्रामीण भागातून थेट शहरी भागात येऊ लागला असल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी सुद्धा शेतात जाण्याची हिंमत करू शकत नाही, दुर्गम भागात लहान बालकांना शाळेत पाठविताना पालकांच्या मनात भीतीचे वातावरण असते. अहिल्यानगर जिल्ह्यासह राहरी तालुक्यात सर्वत्र बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायद्यात तातडीने बदल करावेत, बिबट्यांची नसबंदी अथवा इतर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी आक्रमक मागणी करत राहुरी तालुक्यातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठविण्याची मोहीम काल राहुरी तालुक्यात सुरू करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत राहुरी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पंतप्रधानांच्या नावाचे पत्र पोहोचवले जाणार असून शेतकऱ्यांची सही, नाव व मोबाईल क्रमांकासह ही पत्रे पोस्टाने थेट पंतप्रधान कार्यालयात पाठविली जाणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ अनेक शेतकऱ्यांच्या हस्ते श्री तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयातून करण्यात आला.
_____________________________________ चौकट
सरकार जनतेसाठी की बिबट्यांसाठी ?
पूर्वी वाघांची संख्या कमी होती म्हणून संरक्षण दिले गेले जात होते परंतु आज बिबटे माणसांवरच हल्ले करत आहेत. मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होत असताना जर कायदा बदलला जात नसेल, तर सरकार जनतेसाठी काम करते की बिबट्यांसाठी ? असा थेट सवाल यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला.
______________________________________
केंद्र सरकारने केलेल्या सध्याच्या कायद्यामुळे बिबट्याला केसालाही धक्का लावता येत नाही. सुरक्षित वातावरणामुळे बिबट्यांची पिल्ले मोठ्या प्रमाणावर जगत असून भविष्यात पाच वर्षात संख्या दुप्पट-तिप्पट होण्याचा धोका आहे. तसे झाल्यास संध्याकाळी पाच नंतर संपूर्ण जिल्ह्यात शुकशुकाट होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. ही मोहीम लोकशाही मार्गाने भावना मांडण्याचा पहिला टप्पा असून, सरकारने दखल न घेतल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन, गाव बंद, रास्ता रोको मोठ्या प्रमाणात छेडले जातील, असा स्पष्ट इशाराही तनपुरे यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे.
बिबट्यांच्या दहशतीमुळे भयग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा आवाज थेट दिल्लीत पोहोचवण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम आता संपूर्ण तालुका मतदार संघात पसरवली जाणार असून, केंद्र सरकारला कायद्यात बदल करण्यास भाग पाडल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.




Post a Comment
0 Comments