पुणे - नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे प्रकल्पाचे संपूर्ण माहीती पहा
विशेष वृत - भारतिय रेल्वे द्वारा
संपूर्ण माहिती - शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात बुधवारी प्रस्तावित मार्गाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मूळ संरेखना (अलाइन्मेंट) रद्द करून नवीन पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)- अहिल्यानगर- निंबळक-पुणतांबा- पिंपळगाव- साईनगर शिर्डी-नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
‘पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाची मूळ अलाइन्मेंट महाराष्ट्र रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केली होती. पुणे-नाशिक रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग नारायणगावातून जात होता. तो ‘जीएमआरटी’ या आंतरराष्ट्रीय खगोल-निरीक्षक प्रकल्पाजवळून जाणारा होता. विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने या मार्गाबाबत आक्षेप नोंदवला.
रेल्वे लाइनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याने नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्य सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर ‘जीएमआरटी’ क्षेत्र टाळून नवीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. नवीन मार्ग हा पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)-अहिल्यानगर- निंबळक-पुणतांबा-पिंपळगाव- साईनगर शिर्डी-नाशिक असा असेल,’ असे वैष्णव यांनी सांगितले.
अलाइन्मेंट हलवता येईल?
पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची अलाइन्मेंट बदलण्याबाबत राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए), अणुऊर्जा विभाग आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त त्रिपक्षीय तांत्रिक समितीने काही मूल्यमापन केले आहे का, असे कोल्हे यांनी विचारले. तळेगाव-उरळी कांचन मार्गावरील मुंबई–मिरज तिसरी आणि चौथी मार्गिका विस्ताराच्या प्रस्तावाला खेड तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे अनेक घरे आणि शेतीची जमीन नष्ट होण्याची शक्यता असल्याने प्रस्तावित १२ गावांतून अलाइन्मेंटला विरोध आहे. जुन्नर,आंबेगाव आणि खेड तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही अलाइनमेंट पुनर्विचार करून थोडी उत्तरेकडे १५-२० किलोमीटर हलवता येईल का, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यावर वैष्णव यांनी, रेल्वे मंत्रालयाची ताठर भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.
सद्यस्थिती व कामांची प्रगती
नाशिक रोड-साईनगर शिर्डी दुहेरीकरणाचे डीपीआर तयार.
साईनगर शिर्डी-पुणतांबा (१७ किलोमीटर) दुहेरीकरणासाठी २४० कोटींची मंजुरी.
पुणतांबा-निंबळक ८० किलोमीटर दुहेरीकरण पूर्ण.
निंबळक अहिल्यानगर सहा किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सुरू.
अहिल्यानगर-पुणे (१३३ किमी) नवीन दुहेरी मार्गासाठी ८,९७० कोटींचे डीपीआर पूर्ण, चाकण औद्योगिक वसाहतीला थेट जोडणार.
#news #LatestNews #train #indian #railway #Update #pune #nashik


Post a Comment
0 Comments