बँकांतून सोन्याचे मूल्यांकन करणाऱ्या सोनार समाजाचा “कृतज्ञता सोहळा” मुंबईत दिमाखात संपन्न
सतर्क खबरबात जिल्ह्याची ( विशेष वृत्त )
मान्यवरांचा गौरव – न्यायाच्या लढ्याला नवी दिशा !
गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन, महाराष्ट्रच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने,
मागील काळात गोल्ड व्हॅल्युअर्स (सोनार) समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ठामपणे आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित “कृतज्ञता सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून ठोस भूमिका मांडणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला.
विशेषतः, महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री मा. डॉ. पंकजजी भोयर आणि मा. आमदार चित्राताई किशोर वाघ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेसह विविध प्रशासकीय स्तरांवर सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनार समाजाचे “कोहिनूर हिरा”, तसेच असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक व निवृत्त सहआयुक्त मा. संजीव खडके होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बँकांकडून सोन्याचे मूल्यांकन करताना सोनारांना दिली जाणारी अत्यल्प व अन्यायकारक फी, तसेच त्यांच्या खांद्यावर टाकण्यात येणाऱ्या अवास्तव जबाबदाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकला. या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय्य तोडगा काढावा, अशी त्यांनी ठाम मागणी केली.
मा. डॉ. पंकजजी भोयर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या विषयावर शासन पातळीवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी आपल्या मनोगतात मा. आमदार चित्राताई वाघ यांनी सोनार समाजाची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे अधोरेखित करत, बँकांमार्फत होणारे सोन्याचे मूल्यांकन हेच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन उरले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम व आग्रही भूमिका मांडली.
या सोहळ्यास MSME विभागाचे डेप्युटी डायरेक्टर श्री प्रफुल्ल उमरे, GJEPC पश्चिम विभागाचे डायरेक्टर श्री मिथिलेश पांडे, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे CEO श्री सौरभ मिश्रा, ज्येष्ठ विधीज्ञ श्री विलासराव जोशी, MCX च्या उपाध्यक्ष श्रीमती लाड, तसेच महिला विकास मंडळाच्या सदस्या श्रीमती पद्मिनीताई शंकरशेट यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तसेच असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री परषोत्तम काळे, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राजेंद्र दिंडोरकर, ॉॉ,, प्रशासकीय सचिव श्री सतिश पितळे, सन्माननीय संचालक श्री भरत ओसवाल, तज्ञ मार्गदर्शक श्री शैलेश खरोटे, खजिनदार श्री दीपक देवरुखकर, उपाध्यक्ष श्री चेतन राजापुरकर, श्री राजाभाऊ वाईकर, सह-खजिनदार श्री कालिदास कांदळगावकर, तसेच सन्माननीय सदस्य श्री समीर शहा आदींचीही उपस्थिती उल्लेखनीय होती.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी सोनार समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक आणि लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या सोहळ्याला भव्य स्वरूप दिले.
हा “कृतज्ञता सोहळा” सोनार समाजाच्या एकजुटीचा, संघटित शक्तीचा आणि न्यायासाठीच्या सामूहिक लढ्याचा प्रेरणादायी मैलाचा दगड ठरला.


Post a Comment
0 Comments