ज्ञानेश्वर मोहनिराज थोटे यांना राज्यस्तरीय " कलारत्न " पुरस्कार प्रदान
नेवासा - ( प्रतिनिधी )
अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या अष्टपैलू कौशल्याने नेवासा येथील हरहुन्नरी कलाकार ज्ञानेश्वर थोटे यांनी शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नाशिक येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात ज्ञानेश्वर थोटे यांना 2026 सालच्या मानाच्या राज्यस्तरीय " कलावंत " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा विशेष गौरव सोहळा कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे खास नियोजन स्वागताध्यक्ष श्री सुनील मोंढे सर यांनी केले होते. ज्ञानेश्वर थोटे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अहिल्यानगरचे ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध व्याख्याते, माजी पोलीस अधिकारी श्री सुभाषजी सोनवणे सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची उपस्थिती लाभली होती. ज्ञानेश्वर थोटे यांनी कलाक्षेत्रात विशेषत: वेब सिरीज, लघुपट, चित्रपट या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच त्यांची जिद्द , चिकाटी आणि कष्टाची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या अतिशय आनंदाच्या क्षणी ज्ञानेश्वर थोटे भावुक झाले होते या पुरस्काराविषयी बोलताना त्यांनी या संपूर्ण यशाचे श्रेय आपली अर्धांगिनी सौ. राधिका थोटे यांना दिले आहे. त्यांची खंबीर साथ असल्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळातही अशाच नवनवीन कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजनi करण्याचा आणि आपल्या " नेवासा " गावाचे नाव मोठे करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


Post a Comment
0 Comments