Type Here to Get Search Results !

राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याचा कट उधळला ; एलसीबीची कारवाई, २.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याचा कट उधळला ; एलसीबीची कारवाई, २.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त


राहुरी फॅक्टरी  ( प्रतिनिधी )


राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे .


 

या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल २ लाख १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली होती. राहुरी फॅक्टरी परिसरात काही जण दरोड्याच्या तयारीत असून एका चारचाकी वाहनात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली.


त्यानुसार पोलिसांनी राहुरी फॅक्टरी ते कोल्हार मार्गावर नाकाबंदी करून संशयित वाहनाचा शोध घेतला. दरम्यान, गुहा गाव परिसरात कोल्हारकडून राहुरीकडे येणारे संशयित वाहन दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले. वाहनातील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे करण राजू उर्फ राजेंद्र साळुंखे (रा. नांदूरखी रोड, शिर्डी), सनी उर्फ सल्ल्या राजेंद्र पवार (रा. सावळीविहीर, ता. राहाता), जितेंद्र रोहिदास वाघमारे(पिंपळस, ता.राहता) अशी सांगितली. तर निलेश मोकळ (रा. सावळीविहीर, ता. राहाता) हा फरार असल्याचे समोर आले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन मोबाईल फोन, एक स्वीफ्ट कार, ३५ लिटर डिझेल, लोखंडी कटावणी, टॉर्च, प्लास्टिक पाईप तसेच इतर साहित्य असा एकूण २,१५,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यातील आरोपीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१०(४) व ३१०(५) नुसार दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments