ग्रामीण भागात केंद्रांचा अभाव; स्मार्ट कार्डअभावी महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची एसटीत अडवणूक, पूर्ण तिकीट मोजण्याची वेळ
राहुरी ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिलांना व ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासात ५० टक्के सवलत देणाऱ्या योजनेसाठी
'स्मार्ट कार्ड' अनिवार्य केल्याने ग्रामीण भागातील महिला प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. स्मार्ट कार्ड नसणाऱ्या महिलांना थेट पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाने महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीची घोषणा केली.
सुरुवातीला आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी एसटी महामंडळाने या योजनेसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. स्मार्ट कार्ड नसेल तर महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलत नाकारून संपूर्ण तिकिटाची आकारणी करण्याचे निर्देश वाहकांना (कंडक्टर) देण्यात आले आहेत. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.
ग्रामीण भागात माहितीचा अभाव आणि केंद्रांची कमतरता
या निर्णयाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील महिलांना बसला आहे. अनेक खेड्यापाड्यांत या निर्णयाची पुरेशी माहितीच पोहोचलेली नाही. त्यामुळे एसटीत चढल्यानंतर जेव्हा वाहक पूर्ण तिकीट मागतो, तेव्हा महिला आणि वाहकांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळत आहे.
तसेच, स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारी अधिकृत केंद्रे ही केवळ मोठ्या गावच्या ठिकाणी किंवा मुख्य बस स्थानकांवरच उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात ही सुविधा नसल्यामुळे महिलांना कार्ड काढण्यासाठी कामाचा दिवस मोडून, पैसे खर्च करून तालुक्याला जावे लागत आहे. अनेक ठिकाणी केंद्रांवर असणाऱ्या लांबलचक रांगा आणि सर्व्हर डाउन असण्याच्या तांत्रिक अडचणींमुळे महिलांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.
प्रवाशांचे हाल अन् वाहकांशी वाद
दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांचीही यात अडचण झाली आहे. महामंडळाच्या नियमांमुळे वाहकांना स्मार्ट कार्डशिवाय सवलत देणे शक्य नाही. यामुळे रोजच्या प्रवासात महिला व ज्येष्ठ नागरिक आणि वाहकांमध्ये शाब्दिक वाद होत असून प्रवासादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.
योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
शासनाने महिलांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू केली असली, तरी लाभार्थीच या योजनेपासून वंचित राहत आहेत. जोपर्यंत शंभर टक्के महिलांचे स्मार्ट कार्ड काढून पूर्ण होत नाही, तोपर्यंत आधार कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्राच्या आधारे सवलत पूर्ववत चालू ठेवावी, अशी जोरदार मागणी ग्रामीण भागातील महिलांकडून केली जात आहे.
तसेच, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर किंवा सेतू केंद्रांद्वारे स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सुलभतेने हे कार्ड मिळवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एसटी प्रशासनाने यावर त्वरित तोडगा न काढल्यास महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचा आक्रोश आणखी वाढण्याची शक्यता आहे.
स्मार्ट कार्ड असूनही त्यात बॅलन्स नसल्याने पूर्ण टिकीट
काही महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढले असून त्यात आपल्याला प्रवासासाठी आवश्यक बॅलन्स आवश्यक आहे हे महिलांना माहीत नसल्याने अनेकांच्या स्मार्ट कार्ड मध्ये बॅलन्स नाही त्यामुळे देखील महिलांची मोठी अडचण होत आहे. याबाबत देखील महिलांना स्मार्ट कार्ड बनवून देणाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ७५ वर्ष वयाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना देखील हे कार्ड अनिवार्य आहे . त्यात देखील प्रति प्रवासासाठी दोन रुपये कार्ड मध्ये ठेवणे आवश्यक आहे . हे देखील या ज्येष्ठ नागरिकांना माहीत नसल्याने त्यांची देखील अडचण झाली आहे.




Post a Comment
0 Comments