राहुरीत डी जे च्या दणदणाटाची पहिली कारवाई : वांबोरीत तरुणावर गुन्हा दाखल ; राहुरी शहरातही होणार गुन्हा दाखल
राहुरी ( प्रतिनिधी )
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाने डीजे व उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांवर बंदी घातलेली असतानाही वांबोरी येथे डीजेचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी डिजेसह एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुण शासनाच्या डीजे बंदी आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आला. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक यासह प्रशासनाने डीजे व उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांवर निर्बंध घातले असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील भानुदास निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून पोलीस नाईक अशोक झिने तपास करीत आहेत.
गणेशोत्सवाच्या जल्लोषात नियमांचा विसर पडल्यास पोलिसांची कारवाई अटळ असल्याचा संदेश या कारवाईतून मिळाला आहे.
त्यामुळे मंडळे व ध्वनीवर्धक चालकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे,असे आवाहन करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments