दोन दिवसांपासून तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद
राहुरी ( प्रतिनिधी ) -
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वन विभाग प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होवून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर दोन दिवसा नंतर ताहाराबादमध्ये तळ ठोकून बसलेला बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. त्यामुळे वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले .
गेल्या काही दिवसां पासून राहुरी तालुक्यातील ताहाराबाद परिसरात तळ ठोकून बसलेला बिबट्या काल दि.१० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेरबंद झाला. जगताप वस्तीवर एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला. या बिबट्याला डिग्रस नर्सरी येथे हलविण्यात आले. गेले काही दिवसा पासून बिबट्यांनी गावातील अनेक जनावरे फस्त केले होते. त्यामुळे ताहाराबाद गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याच्या भितीने शेतकरी शेतात जायला घाबरत होते. आता बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे, वनपाल शेंडगे भाऊसाहेब, वनरक्षक शंकर खेमनर, समाधान चव्हाण, राजू घुगे, वाहन चालक ताराचंद गायकवाड, सुभाष घनदाट, मदन गाडेकर, महादेव शेळके, सतिष जाधव, बाळासाहेब झावरे आदी उपस्थित होते.
ताहाराबादसह म्हैसगाव येथे बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. आज केवळ एकच बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. मात्र अशी अनेक बिबटे आजही सर्रासपणे म्हैसगाव व अन्य परिसरामध्ये निदर्शनास येत आहे. त्यामुळे वन विभागाने ताहाराबादसह इतर ठिकाणीही पिंजरे लावावे, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

Post a Comment
0 Comments