Type Here to Get Search Results !

सहविद्यार्थ्यांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार

 सहविद्यार्थ्यांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार



राहुरी  ( प्रतिनीधी )

              राहुरीतील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली दरम्यान घडलेल्या एका अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला, मात्र या संकट समयी काही विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या शौर्याने आणि प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचवले. सहविद्यार्थ्यांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच विद्यालयात करण्यात आला.



                  स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातला जाणारी शाळेची बस चिंचोली फाटा येथील खराब नगर मनमाड रस्त्यामुळे ऐका बाजूला पलटी झाली. बसमध्ये 45 विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षिका होते. अचानक झालेल्या या अपघातामुळे सगळीकडे हाहाकार माजला. विद्यार्थी मदतीसाठी आरडाओरड करू लागले, तर काही जण घाबरून सुन्न झाले. परंतु या संकटाच्या क्षणी विद्यालयातील चि. प्राजक्त अमोल राऊत, तेजस कैलास रणसिंग, दुर्गेश संजय फंड, शुभम प्रकाश मोरे, शुभम सतीश वाघ (सर्व दहावी) आणि प्रथमेश नानासाहेब वाघमारे (नववी) यांनी दाखवलेले धैर्य अविस्मरणीय ठरले. बस मधून बाहेर पडण्यासाठी कोणतीही जागा नसल्याने बसच्या पाठीमागील बाजूस बसलेल्या दहावीतील विद्यार्ध्यानी आपला जीव धोक्यात घालून क्षणाचाही विलंब न लावत बसमधील पाठीमागील इमर्जन्सी काचेचा दरवाजा पायाने, हाताने फोडला तसेच दुसऱ्या बस मधील नववीच्या विद्यार्थ्यांची बस थांबतच प्रथमेश वाघमारे हा बस मधून उतरून पळत जाऊन बसच्या पुढील बाजूच्या ड्रायव्हर समोरील काचा फोडून आत प्रवेश करून मुलांना बाहेर काढले. यावेळी स्थानिक नागरिकांनींही मोठी मदत केली व विद्यार्थिनींना सुरक्षित बाहेर काढले. विद्यार्थ्यांच्या या कृत्यामुळे संकटात अडकलेल्या अनेकांचे जीव वाचले.

             प्रशालेत या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. स्वाती राऊत , सौ.कविता रासकर, ज्येष्ठ शिक्षक शाकीर सय्यद, संजय पवार, समीर शेख, युवराज भोसले यांच्या उपस्थितीत त्यांना शौर्याबद्दल सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव मनोज्ञ बिहाणी, सहसचिव अनुप बिहानीं मुख्याध्यापक कैलास अनाप, उपमुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे, पर्यवेक्षक पवार आर.जे. यानी कौतुक केले.यावेळी प्राध्यापक रविंद्र घनवट यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले, "या मुलांनी दाखवलेल्या समय सूचकतेने आणि धैर्याने संपूर्ण विद्यालयाला अभिमानास्पद क्षण दिला आहे. ही केवळ शौर्याची कथा नाही, तर संकटाला सामोरे जाण्याची शिकवण आहे."

             विद्यालयाने या विद्यार्थ्यांना बाल शौर्य पुरस्कारासाठी नामांकन दाखल करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या कृत्याचे राहुरी शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांनी दाखवलेले साहस आणि माणुसकीचे मूल्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यांनी सिद्ध केले की, संकट कितीही मोठे असले तरी संयम, धैर्य, आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची जिद्द आपल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढू शकते.

                 राहुरीच्या या शूर विद्यार्थ्यांचा सन्मान केवळ त्यांच्या शाळेपुरता मर्यादित नाही, तर ते संपूर्ण समाजासाठी एक आदर्श ठरले आहेत. अशा धाडसी आणि संवेदनशील विद्यार्थ्यांमुळेच आपले भविष्य उज्ज्वल आहे. या शौर्याला सलाम!

Post a Comment

0 Comments