Type Here to Get Search Results !

अतिक्रमणाचे भूत सामान्यांच्या मानगुटीवर ; महामार्गावर 15 मीटर पर्यंतची सीमा रेषा ! मोजणी झाली आता काय होणार ?

अतिक्रमणाचे भूत सामान्यांच्या मानगुटीवर ; महामार्गावर 15 मीटर पर्यंतची सीमा रेषा ! मोजणी झाली आता काय होणार ?



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त 

सध्या सर्वत्र अतिक्रमणांची जोरदार चर्चा सुरू आहे . शहरांतर्गत , मुख्य रस्त्यावरील , महामार्गावरील एवढेच नव्हे रेल्वे मार्गालगत व पाटबंधारे विभागाच्या कालव्यालगतच्या अतिक्रमणांची चर्चा होत आहे .

 प्रशासनाने जानेवारी अखेरीला सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आदेश स्थानिक पालिका , महापालिका , सार्वजनिक बांधकाम विभाग , एन. एच. ए. आय.   

( भारतीय रस्ते महाविकास प्राधिकरण ) , रेल्वे प्रशासनाचे विभाग , आदींना दिल्यानंतर सर्वत्र स्थानिक प्रशासन अलर्ट होऊन ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून आले आहे .

राहुरी नगरपालिका हद्दीत काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार असे समजताच अनेकांनी आपापले दुकाने , हातगाडी , पाल , टपरी काढून घेतले . अनेक दुकानदारांनी आपले रस्त्यावर आलेले फलक बोर्ड देखील काढून घेतले . सध्या राहुरी शहर व परिसरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण दुकानदारांनी व छोट्या व्यावसायिकांनी काढून घेतल्यामुळे रस्ते अगदी मोकळे दिसून येत आहेत . एक प्रकारे पालिका प्रशासनाचे अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे .

 त्यातच आता कोपरगाव - नगर या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत . बुधवारी एन एच ए आय च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग , पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने राहुरी व बस स्थानक परिसरातील महामार्गावरील रस्त्याच्या प्रत्यक्ष मोजणी मध्ये सहभाग घेतला , यावेळी आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये कुजबुज सुरू होती . 

        प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला पंधरा मीटर पर्यंत ची मोजणी होत आहे .15 मीटर च्या आतील जे भाग असतील ते वगळता  त्या बाहेरील अतिक्रमण मध्ये गृहीत धरत ती काढली जाणार आहेत . महामार्गाच्या निर्धारित सीमारेषे बाहेरील अतिक्रमण काढली जातील,  मात्र ही कारवाई कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

दरम्यान , राहुरी शहर व महामार्गावरील सुमारे एक हजार हून अधिक व्यवसायिकांनी आपापले व्यवसाय रस्त्याच्या कडेला थाटले आहेत , असे एका पाहणीतून दिसून आले आहे . या छोट्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह यावरच होतो . खेड्यापाड्यातील ग्रामस्थ , नागरिक एवढेच नव्हे तर शिर्डी - शनिशिंगणापूर , कृषी विद्यापीठ , नाशिक आदी भागातून येणारे भाविक , पर्यटक याच रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडे येण्याचा कल असतो . 

सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सर्व विभागांची सुरू असली तरी संबंधित प्रशासनाने या छोट्या व्यावसायिकांच्या होणाऱ्या नुकसान इकडे लक्ष देत संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून काही स्थानिक निर्णय घ्यावेत , अशी मागणी छोट्या व्यावसायिकांच्या काही गटांकडून करण्यात आली आहे . याकडे स्थानिक प्रशासन कशा पद्धतीने हाताळते हे महत्त्वाचे आहे. 


Post a Comment

0 Comments