Type Here to Get Search Results !

पालिका प्रशासन अतिक्रमण हटावसाठी कठोर : शुक्लेश्वर चौक , शिवाजी चौकाला लागला घोर

पालिका प्रशासन अतिक्रमण हटावसाठी कठोर : शुक्लेश्वर चौक , शिवाजी चौकाला लागला घोर



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त

न्यायालयीन आदेशानंतर राहुरी नगरपालिका प्रशासन देखील ॲक्शन मोडवर येत आज शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई सुरू झाली आहे .

           राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे , पालिका प्रशासन यांनी आज सकाळी शहरातील नवी पेठेपासून अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविण्यास प्रारंभ केला आहे. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे .


प्रगती विद्यालय रोडवरील रस्त्यावरील अतिक्रमण यावेळी काढण्यात आली . तसेच ग्रामीण रुग्णालयाजवळ , नवी पेठ येथील पृथ्वी कॉर्नर जवळील अतिक्रमणे यावेळी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली . पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .

         रस्त्यावरील अतिक्रमणे काढताना पालिकेने दुजाभाव न करता मोठ्या लोकांची ही अतिक्रमणे काढावी अशी मागणी शहरातून होत आहे .



 दरम्यान नगर मनमाड रस्ता कुलकर्णी हॉस्पिटल ते शुक्लेश्वर चौक , शुक्लेश्वर चौक ते शिवाजी चौक , शिवाजी चौक ते शनी मंदिर चौक या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्ग व नागरिकात प्रचंड भीती व्यक्त करण्यात येत आहे . पूर्वीपासून रस्त्याचे जे अंतर आहे त्यामध्ये आणि सध्या नगरपालिकेने निर्धारित केलेल्या रस्त्याचे अंतर यात मोठा फरक असल्याचे बोलले जात आहे . या भागातील काही नागरिक व्यापारी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वेळ पडल्यास चर्चा करून आपले म्हणणे मांडणार असल्याचे चर्चा आहे . त्यामुळे नगरपालिका नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .


Post a Comment

0 Comments