महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन : राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहावे - संभाजी पवार
राहुरी ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे दिनांक १५ व १६ मार्च रोजी वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनास राज्यातील ग्रंथालय कर्मचारी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघा'चे संचालक संभाजी पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५९ वे वार्षिक अधिवेशन दिनांक १५ व १६ मार्च रोजी गांधी विनोबांच्या पावनभूमीत सत्यनारायण बजाज जिल्हा सार्वजनिक वाचनालयाच्या प्रागंणात,वर्धा येथे होणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन खा.अमर काळे करणार असून, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या अधिवेशनास मंत्री महोदयासह,आ.विजय वडेट्टीवार,आ.अभिजित वंजारी,आ.सुधाकर अडबाले,राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांची सर्वोच्च शिखर संस्था असून, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वर्धा येथे होत आहे.
राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ग्रंथालयाच्या व कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रश्नांवर विचार मंथन होणार आहे.
ग्रंथालयाच्या मागण्या व कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना सोडविण्यासाठी चर्चा होऊन राज्य ग्रंथालय संघ शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी राज्य संघाच्या बैठकीत नुकतीच ४०% टक्के अनुदान वाढ घोषित केली असली तरी शासननिर्णय झाला नाही.संघाची महागाई निर्देशंकानुसार तिप्पट अनुदान वाढीची मागणी आहे. याशिवाय कर्मचारी वेतनश्रेणी, सेवाशर्ती व सेवा नियमसह आपले अनेक प्रश्न शासन स्तरावर दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. ते सुटले पाहिजेत.
यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपली शक्ती प्रदर्शित करण्याची हीच संधी आहे. आणि संख्याबळ आपल्या शक्तीचे निदर्शक असते. याशिवाय अधिवेशनात होणारी चर्चासत्रे आपल्या अधिक माहितीची शिदोरी देणारी आहे. त्यामुळे राज्यातील ग्रंथालय पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य ग्रंथालय संघा'चे संचालक संभाजी पवार,जिल्हा ग्रंथालय संघा'चे संस्थापक सदाशिवराव शेळके,अध्यक्ष सुरेद्रं शिदें,अँड.अजिनाथ जायभाय,पनाजी कदम,विष्णुपंत पवार,अमोल इथापे, नामदेव गरड,भाऊसाहेब गवळी,कदमराव पवार सार्व.वाचनालयाच्या सुरेखा पवार,प्रदिपकुमार बजाज,कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील,कार्यवाह सोपानराव पवार,राम मेकाले यांनी केले आहे.



Post a Comment
0 Comments