Type Here to Get Search Results !

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे या संघ प्रार्थनेची जन्म कथा पहा

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे या संघ प्रार्थनेची जन्म कथा पहा

सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त

            'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे... त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोहम् ।' म्हटलं की सर्वाच्या नजरेसमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाची शाखा येते अन् संघाची प्रार्थना !

          शतकाकडे वाटचाल करत असणाऱ्या संघाच्या प्रार्थना ही 85 वर्षांची होत असून, प्रार्थनेच्या शक्तीवर संघाची वाटचाल परमवैभवाच्या दिशेने होत असताना संघ स्वयंसेवकांना या निमित्ताने उजाळा मिळत आहे .

अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बहुतांश मोबाईल धारकांच्या डायलटोन , रिंगटोन , कॉलर ट्यून या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे या गीतातूनच ऐकावयास मिळतात .

          राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी केली. आज इवल्याशा रोपट्याने वटवृक्षाचे रुप सर्वच पाहत आहेत. संघशाखेत म्हटली जाणारी 'प्रार्थना' आजही तितकीच प्रेरणादायी, देशप्रेम वाढवणारी आहे. 

        याच प्रार्थनेचे १९४० व्या पुणे येथील संघ शिक्षा वर्गात प्रथम गायन केले गेले. आज 85 वर्षे होत आली तरी प्रार्थनेची गोडी व महत्व कायम राहिलेले आहे.

संघाच्या सुरुवातीच्या काळात जी प्रार्थना म्हटली जायची त्यात एक मराठी व एक हिंदी एक श्लोक असायचा.

हे गुरो ! श्री रामदूता ! शिल हमको दिजिये शीघ्र सारे सद्गुणसे पूर्ण हिंदू कीजिए I लिजिये हमको शरणमे रामपंथी हम बने I ब्रह्मचारी धर्म रक्षक व्रतधारी हम बने I 


१९३९-४० सालापर्यंत हीच प्रार्थना संघशाखेवर होती.

पुढील काळात संघाची व्याप्ती वाढत असताना संघ कार्यकर्त्यांसाठी. १९२९ साली नागपुरात पहिला संघ शिक्षा वर्ग तर १९३५ साली नागपुराबाहेर पुणे येथे वर्ग सुरू झाला. १९४० साली मे महिन्यात पुणे येथील संघ शिक्षा वर्गात सध्याची प्रार्थना यादवराव जोशी यांनी म्हटली, त्यास चालही त्यांनीच दिली. संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. गो. वैद्य यांनी लिहिलेल्या 'सुबोध संघ' या पुस्तकात याची माहिती देण्यात आली आहे.

त्यावेळी १९३९ साली प्रार्थनेच्या आशयाचा मसुदा सिंदी (नागपूर) येथील बैठकीत तयार करण्यात आला. या बैठकीत आद्यसरसंघचालक - डॉ. हेडगेवार, श्री गुरुजी ,

(गोळवलकर), आप्पाजी जोशी, बाबासाहेब आपटे, बाळासाहेब देवरस ही प्रमुख मंडळी उपस्थित होती. नानासाहेब टालाटुलेही होते. प्रार्थना संस्कृतमध्ये आहे व 'भारत माता की जय' हे हिंदीत आहे.

प्रार्थनेच्या मसुद्याचे संस्कृत रुपांतर नागपूरचे नरहर नारायण भिडे यांनी केले. मे १९४० मध्ये पुण्याच्या वर्गात यादवराव जोशी यांनी ती गायिली. आता 85 वर्षे होत आहेत. अलिकडच्या काळात संघाची शतक वर्षाकडे वाटचाल सुरू असून, देशभरात 50 हजाराहून अधिक ठिकाणी 60 हजार शाखा. 40 हजार साप्ताहिक मीलनशाखा, 25 हजारहून अधिक ठिकाणी 'संघमंडळी' असा संघ विस्तार आहे .


    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'संघ शिक्षा वर्ग' हा महत्वाचा मानला जातो. यात परिपूर्ण प्रशिक्षणातून कार्यकर्ता घडवला जातो. अलिकडच्या काळात देशभरात 40 ते 45 ठिकाणी संघ प्रशिक्षण तथा 'प्रथम वर्ष', तर १३ ते १५ ठिकाणी 'द्वितीय वर्ष प्रशिक्षण वर्ग तर तृतीय वर्ष ( संघ शिक्षा वर्ग ) हे संघाची भूमी असणाऱ्या नागपूर येथे याच मे-जून महिन्याच्या काळात होते . सध्या ते सुरू झाले आहे .

    यंदाच्या वर्षी देशभरात संघ शिक्षा वर्ग प्रशिक्षण सुरू असून महाराष्ट्रात नाशिक , सोलापूर , नागपूर अन्य ठिकाणी असे वर्ग सुरू आहेत . पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत व अन्य पदाधिकारी यांचे या सर्व संघ शिक्षा वर्गात प्रवास बहुतेक देखील सुरू आहेत .

संघाच्या प्रार्थनेच्या 85 वर्ष निमित्ताने ठिकठिकाणी होणाऱ्या वर्गामुळे प्रार्थनेच्या आठवणींना संघाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांकडून उजाळा मिळत आहे.

संघाच्या प्रार्थनेतून देशभक्ती, राष्ट्राभिमान जागवण्याची शक्ती, हे राष्ट्र परमवैभवाला नेण्याचे ध्येय आजही संघ स्वयंसेवकासह राष्ट्रप्रेमींना प्रेरणादायी ठरतं असल्याचे पहावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments