अहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कपाळे तर अजिनाथ हजारे उपाध्यक्ष
अहिल्यानगर ( प्रतिनिधी )
गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाची संचालक मंडळाची
पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदी शिवाजीराव कपाळे व उपाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदासाठी वासुदेव काळे यांनी शिवाजी कपाळे यांच्या नावाची सूचना मांडली. ज्ञानदेव पाचपुते यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमन पदासाठी अजिनाथ हजारे यांच्या नावाची सूचना मिलिंद गंधे यांनी करून विठ्ठल अभंग यांनी अनुमोदन दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदाकिनी ठोकळ यांनी काम पाहिले.
यावेळी स्थैर्यनिधी संघाचे मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे, माजी उपाध्यक्ष वसंत लोढा, नूतन संचालक वासुदेव काळे, वसंत कवाद, उमेश मोरगावकर, ज्ञानदेव पाचपुते, मिलिंद गंधे, विठ्ठलराव अभंग पुखराज पिपाडा, आशुतोष पटवर्धन, राणीप्रसाद मुंदडा, राजेंद्र खटोड, सुशीला नवले आदी उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
नूतन चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले, २०१० साली स्थापन झालेल्या स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पतसंस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्न संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे व उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी चांगल्या पद्धतीने काम करून सोडवले आहेत. आता माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळात या पदाच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीतील सर्व प्रश्न सोडवण्यास मी प्राधान्य देणार आहेत. जी प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे व सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. ही पतसंस्था चळवळ अधिक पारदर्शी व मजबूत कशी होईल यासाठी मी प्राधान्य देणार आहे.
नूतन व्हाईस चेअरमन अजिनाथ हजारे म्हणाले, काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थैर्यनिधी सहकारी संघाचे उत्कृष्ट व आदर्शवत काम चालू आहे. हे काम अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून स्थैर्यनिधी संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ अधिक पारदर्शी, स्वच्छ व समस्यामुक्त होण्यासाठी प्रयत्न केले. त्यास चांगले यश आले आहे. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ पुढे नेली. आता शिवाजीराव कपाळे व अजिनाथ हजारे यांच्याकडे या चळवळीचा कारभार सोपवला आहे. हे दोघेही चांगले अनुभवी असल्याने आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मावळते उपाध्यक्ष वसंत लोढा यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.




Post a Comment
0 Comments