हुश्य.... जायकवाडी धरण होतेय 65 टक्के !! नगर नाशिक मध्ये आनंदाचे वातावरण
राहुरी ( प्रतिनिधी )
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण साठा आज धरणाचा उपयुक्त पाणीसाठा आज 65 टक्के पार करणार असल्याने
नगर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला यंदा पाणी देण्याची वेळ येणार नसल्याचे दिसून येत आहे .
यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्र व घाटमाथ्यावर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक ठिकाणी धरणे हाउसफुल झाली आहेत . नाशिक नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये साठ ते सत्तर टक्क्याहून अधिक पाणी जमा झाल्याने बहुतांश धरणातून जायकवाडी कडे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे
मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार जायकवाडी धरणाचा साठा 65% पर्यंत झाल्यास नगर , नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून नदीपात्राद्वारे पाणी देण्याचे आदेश आहेत . यापूर्वी 2013 पासून जायकवाडी धरणात पाच ते सहा वेळा पाणी देण्याची वेळ आली होती . हक्काचे पाणी जायकवाडीला देण्यावरून आतापर्यंत नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष देखील राहिलेला आहे. यंदाच्या वर्षी पावसाने मेहरबानी केली आहे .
आज बुधवार दिनांक नऊ जुलै 2025 ला जायकवाडीचा पाणीसाठा 74.49 टीएमसी ( 72 टक्के ) तर उपयुक्त साठा 48.43 ( 63 टक्के ) इतका झाला आहे . सकाळपर्यंत 24 तासात धरणात साडेचार टीएमसी पाणी जमा होत यंदाच्या हंगामात एकूण 27 टीएमसी पाणी जमा झाली आहे .
जुलै महिन्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी जमा होण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ असावी . आज सकाळी गोदावरी नदीतून नांदूर मध्यमेश्वर येथून 32 हजार 690 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती , परिणामी जायकवाडीचा पाणीसाठा आज किंवा उद्या 65 टक्क्यांचा टप्पा पार करेल ! जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के होत असल्याने नगर नाशिक मधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे .


Post a Comment
0 Comments