राज्यातील धरणांमध्ये जुलै अखेर सुमारे 72% इतका उपयुक्त पाणीसाठा-- इंजि.हरिश्चंद्र चकोर
अहिल्यानगर - खबरबात जिल्ह्याची [ विशेष वृत्त ]
राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 2997 इतकी धरणे असून यावर्षीच्या 31जुलैअखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे 71.77%टक्के (1027.365 टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे .
गतवर्षी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा हा फक्त 58.62% म्हणजेच 839 टीएमसी इतकाच होता , मात्र यावर्षी सुमारे 14 टक्के इतका पाणीसाठा जास्त आहे .
यावर्षीच्या( सन २०२५) मे,जुन , व जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये निश्चितच चांगला पाणीसाठा
झालेला असल्याने व सध्या पडत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे . पावसाचे असेच प्रमाण व सातत्य राहिल्यास लवकरच म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्व धरणे शंभर टक्के भरू शकतील असा अंदाज देखिल श्री. चकोर यांनी व्यक्त केला आहे.
(जलसंपत्ती अभ्यासक, जलसिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर)
पुढे बोलताना श्री चकोर यांनी सांगितले की, राज्यात सहा(६) महसुली विभाग असून 01ऑगस्ट 2025 रोजी उपयुक्त पाणी साठ्या ची स्थिती खालील प्रमाणे आहे
कोकण विभाग -
या विभागात एकूण 173 धरणे असून त्यांमध्ये आजमीतीस सुमारे 110.87 टी.एम.सी.( 84.74%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे .
नाशिक विभाग -
नाशिक विभागात 537 इतकी लहान,मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस 140.415 टीएमसी (66.98%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
पुणे विभाग -
पुणे विभागात एकूण 720 धरणे असून त्यामध्ये आज 438.990 टीएमसी (81.73)% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
मराठवाडा विभाग -
मराठवाडा विभागामध्ये एकूण 920 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे 150.945 टीएमसी ( 58.87)% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
अमरावती विभाग -
अमरावती विभागामध्ये 264 धरणे असून त्यामध्ये 81.737 टीएमसी ( 61.21%)
आणि
नागपूर विभाग -
नागपूर विभागात 383 धरणे असून या धरणांमध्ये 104.405 टीएमसी ( 63.66%) टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
सर्वात जास्त पाणीसाठा कोकण विभागात (84.74%) आणि त्या खालोखाल पुणे विभागात (81.73%) असून सर्वात कमी पाणीसाठा मराठवाडा विभागात (58.87%)असल्याचे दिसून येत आहे .
महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रमुख मोठ्या तीन(3 )धरणांमधील एकूण एकत्रित पाणीसाठा खालील प्रमाणे आहे .
१) उजनी धरण - 116.17 टी.एम.सी . ( 99.08% )
२) कोयना धरण - 86.19 टी.एम.सी. ( 81.88% )
३) जायकवाडी - 96.23 टी.एम.सी. ( 93.67% )
इतका एकूण पाणीसाठा आहे .
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच (५) धरणांमध्ये सुमारे 17.10 टी.एम.सी.( 96.24%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात सुमारे 11.25 टीएमसी (94% )इतका पाणीसाठा आहे .
नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात एकूण सुमारे 9.918 टी.एम.सी. म्हणजेच सरासरी (85.50%) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
आज सर्वात जास्त पाऊस म्हणजे घाट माथ्यावर मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 4827 मिमी व लोणावळा येथे 3142 मिमी आणि कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी धरण येथे आतापर्यंत सुमारे 2839 मिमी व नातुवाडी येथे 2875 मी.मी.इतका पाऊस नोंदविला गेला आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या भंडारदरा धरणात सुमारे 9.563 टीएमसी (86.63%) , निळवंडे धरणात 7.463 टीएमसी(89.70%) , मुळा धरणात 23.234 टीएमसी (89.36%), आढळा धरण - 1.060 टीएमसी (100%) इतका एकूण पाणीसाठा झालेला आहे .
महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणारया पश्चिमघाट माथ्यावरील "घाटघर " येथे आत्तापर्यंत सुमारे 3525 मिमी पावसाची नोंद झालेली आहे .
यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जवळपास सर्वच महसूल विभागामधील धरणांमध्ये समाधानकारक रित्या पाणीसाठा झाल्याने व अजूनही पावसाळायावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितच मिटणार असुन शेती सिंचनासाठी देखील मोठा दिलासा व फायदा मिळणार आहे .
संगमनेर तालुक्यातील निमोन- तळेगाव परिसराला काही अंशी संजीवनी असलेल्या भोजापुर धरण यावर्षी दोन वेळा ओव्हर फ्लो झालेले असून धरणातून कालव्याद्वारे सुमारे 150 क्युसेक्स इतके पाणी सोडलेले आहे . महत्वाचे म्हणजे कालव्यात सोडलेले ओव्हर फ्लो चे पाणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने व आमदार अमोल खताळ पाटील यांचे प्रयत्नातून भोजापूर पूर चारी द्वारे आज कि.मी. 16 मध्ये म्हणजेच तळेगाव (तिगाव माथ्यापर्यंत) जलसंपदा विभागा मार्फत पोहोचविण्यात आले असल्याचे देखील इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी सांगितले.
भोजापुर धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी महायुती
सरकारच्या माध्यमातून तिगाव माथ्यापर्यंत पोहोचत असल्याने संगमनेर तालुक्यातील दुष्काळी व पाट पाण्यापासून वंचित असलेल्या निमोण- तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व सर्वसामान्य जनतेमध्ये गेल्या 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय आनंदी आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे .
तसेच जायकवाडी धरणामध्ये सुमारे 96.23 टीएमसी (94.00)% इतका एकूण पाणीसाठा झाल्याने धरण पूर्ण संचय पातळी नियमन सूचीनुसार (ROS) कालच जायकवाडी धरणा मधून सुमारे 9432 इतके पाणी सांडव्याद्वारे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.
जायकवाडी धरण पहिल्यांदाच जुलै अखेर जवळपास 95 टक्के इतके भरल्याने व नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने मराठवाडा विभागात देखील अत्यंत समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे अशी माहिती इंजि हरिश्चंद्र र चकोर यांनी दिली .




Post a Comment
0 Comments