🚩🚩🚩
शताब्दी संघ संस्काराची ( 10 )
संघशरणता पाहिली मी : बाळ जाधव
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष लेखमाला
कंटकाकीर्ण मार्गावरून संघाचे असंख्य स्वयंसेवक चालत राहिले. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्षांची वाटचाल करू शकला आहे . याच मार्गावरून चालणारा माझा जिवलग मित्र म्हणजे बाळ जाधव.
मी 1986 मध्ये नेवासा येथे नोकरीसाठी आलो आणि त्याच दिवसापासून मला एक जीवलग मित्र मिळाला माझी सावली म्हणून तो 25 ऑक्टोबर 2018 पर्यंत माझ्यासोबत राहिला संघाचे काम करताना आम्ही सदैव बरोबर राहिलो. त्याच्या अनेक आठवणी माझ्यासोबत आहेत. परंतु या लेखमालेचा माझा विषय ' संघ संस्कार ' हा असल्यामुळे मी या लेखमालेत फक्त संघ संस्कार या संबंधीच लिहीत आहे.
( लेखक - सतीश तथा आबा मुळे )
बाळ संघाच्या तृतीय वर्षाला नागपूरला निघाला नेमका निघतानाच त्याला पायाला विंचू चावला. दवाखान्यात जायला वेळ नव्हता. दवाखान्यात गेला असता तर बस आणि वर्ग दोन्ही चुकले असते. पण पठ्ठ्याने पायाला फडके बांधले आणि बूट घालून तसाच लंगडत बस मध्ये बसला आणि आपला वर्ग पूर्ण केला.
संघाचे काम करताना कसे झोकून द्यावे , याचे हृद्य दर्शन मला एकदा घडले. त्याचे असे झाले, शाळा सुटल्यावर आम्ही दोघे प्रवासाला निघालो. तेवढ्यात मोहिनी वहिनी समोर आल्या आणि त्यांनी सांगितले " केदार खूप तापला आहे त्याला दवाखान्यात घेऊन जायचे आहे." केदार म्हणजे बाळचा मुलगा तेव्हा एक वर्षाचा होता. वहिनींच्या बोलण्यानंतर बाळ ताडकन म्हणाला , "तुला दवाखान्यात नेता येत असले तर घेऊन जा नाहीतर माझा मुलगा मेला तरी चालेल , मी संघाच्या प्रवासाला निघालेलो आहे." आजही 40 वर्षानंतर या प्रसंगाची आठवण झाली तरी माझ्या अंतःकरणात कळ येते. बाळची समजूत घालून केदारला घेऊन दवाखान्यात गेलो आणि नंतर प्रवासाला गेलो. आता हाच केदार डॉक्टर होऊन अनेक रुग्णांना बरे करीत आहे. संघाचे काम करताना कोणतीही सबब सांगून काम न टाळण्याचा संस्कार बाळ जाधव याने माझ्यावर केला. मी त्याला कधीही विसरू शकत नाही.
वंदे मातरम l




Post a Comment
0 Comments