Type Here to Get Search Results !

शताब्दी : संघ संस्कारांची ( 8 ) स्वयंसेवकांचे पालक : मान. माणिकराव पाटील

 🚩🚩🚩

शताब्दी : संघ संस्कारांची ( 8 )

स्वयंसेवकांचे पालक : मान. माणिकराव पाटील 

सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष लेखमाला 


(लेखक सतीश तथा आबा मुळे)

आपल्याला काही व्यक्तींविषयी आदर वाटत असतो तर काहींची भिती वाटते. पण ज्यांची आदरयुक्त भिती वाटायची असे एक रुबाबदार व्यक्तिमत्व आम्हा नगरच्या स्वयंसेवकांना मोठ्या भाग्याने लाभले होते. स्व . ॲडव्होकेट माणिकराव नरसिंगराव पाटील जिल्हा कार्यवाह, जिल्हा संघचालक, प्रांत संघचालक व क्षेत्रीय संघचालक या पदांवर काम करीत असताना मी अनुभवले आहेत. संघामधील पद हे मिरविण्यासाठी नाही तर जबाबदारी निभविण्यासाठी असते, याचा वस्तुपाठ म्हणजे आदरणीय दादा म्हणजेच माणिकराव पाटील ! 


सुदैवाने आमची घरे जवळ असल्यामुळे, श्रीफळाप्रमाणे वरुन कडक स्वभावाचे वाटणार्या दादांच्या अंत:करणात मायेचे निर्मळ झरे वाहताना मी पाहिले आहेत.


सहज आठवला म्हणून एक किस्सा सांगतो, नगरच्या रेणाविकर शाळेत जिल्ह्याचा व्यापक अभ्यासवर्ग होता. सन्मित्र सुनील लोढा मुख्यशिक्षक होता. प्रार्थना सांगण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. दादा, मा. जिल्हा संघचालक म्हणून समोर उभे होते. संघाच्या पद्धतीनुसार समोर उभ्या असलेल्या अधिकार्यांना उपस्थिती सांगण्यासाठी मुख्यशिक्षकाला जावे लागते. दादांसमोर जाण्यासाठी सुनील अतिशय घाबरला होता. मला म्हणाला, " आबा, काय करु हो, समोर टायगर आहे ." हे आणि असे अनेक प्रसंग घडायचे पण हेच दादा स्वयंसेवकांच्या कुटुंबातील दु:खद प्रसंगी व संकटकाळी खंबीरपणे पाठीशी उभे रहात होते. दादांचा हात पाठीवरून फिरल्यावर हिंमत कशी वाढते याचा अनुभव मीही अनेकवेळा घेतलेला आहे . आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्रतबंध व विवाह सोहळ्यात दादा आशिर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असायचेच पण काका, काकू, बंधू यांच्या निधनप्रसंगीही सांत्वनासाठी आल्यावर इतर स्वयंसेवकांना आवश्यक त्या सूचना द्यायचे.


दादांचे स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबाकडे किती बारीक लक्ष असते, याची एक छोटीशी कथा. चाळीस वर्षांपूर्वी माझी थोरली कन्या रेणुका पाचसहा महिन्यांची असेल. थंडीचे दिवस होते . संध्याकाळी कधीनव्हत आम्हा उभयतांना रेणुकाला घेऊन फिरायला जायची लहर आली. थाटात घराबाहेर पडलो आणि सोसायटी हायस्कूलच्या रस्त्याने निघालो. याच रस्त्यावर दादांचे तेंव्हाचे घर होते. सुदैवाने की दुर्दैवाने दादा दारासमोरच्या गॅलरीत उभे होते. आम्हाला बोलावून घेतले. पहिला प्रश्न सौभाग्यवती साधनास विचारला, " थंडीचे दिवस आहेत लक्षात नाही आले का ? बाळाच्या अंगावर गरम कपडे का नाही घातले ? निदान एखादी शाल barobar घ्यायची." नंतर घरात नेऊन साधनाची कुंकू लाऊन ओटी वगैरे भरण्यास आईंना सांगितले . प्रसंग खूप छोटा आणि साधा पण दादांच्या शब्दातील ओलावा आणि धाक दोन्ही, साधना अजूनही विसरलेली नाही. 'माणिकराव' असा कुणाच्या बोलण्यात उल्लेख आला तरी आम्हाला ' तो ' प्रसंग आठवतो. त्यानंतर मुलांच्या बाबतीत साधना कधीच निष्काळजी राहू शकली नाही . आता आम्हीही वयस्कर झालो आहोत . साहजिकच दादांप्रमाणे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी यथामती पार पाडण्याचा प्रयत्न करतो.

दादा, आपल्या स्मृतीस संघ शताब्दी निमित्त शत-शत प्रणाम ।

वंदे मातरम् ।

आबा मुळे नेवासा 

12 आक्टोबर 2025

Post a Comment

0 Comments