🚩🚩🚩
संघ शताब्दी : संघ संस्कारांची : सेवेची ठेव , मधू देव
( स्वर्गीय मधू देव )
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष लेखमाला
विजयादशमी . बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. अनेक संघटना जन्माला येतात, मोठा गाजावाजा होतो आणि अल्पावधीत त्या नामशेष होऊन जातात. पण कोणताही उद्घाटन सोहळा न होता, दहापंधरा छोट्या मुलांना गोळा करून सुरु झालेला संघ आज जगातील सर्वात मोठी अशासकीय सामाजिक संघटना बनली आहे . शंभर वर्षाचा पल्ला गाठताना, स्वातंत्र्य मिळाल्यावरही संघाला तीन बंदींना सामोरे जावे लागले. लक्षावधी स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला.
( लेखक - सतिश तथा आबा मुळे )
हजारो कार्यकर्त्यांनी प्राण समर्पित केले आहेत आणि आजही संघ कार्यकर्ते विरोधकांच्या, राष्ट्रद्रोह्यांच्या निशाण्यावर आहेत . तरीही संघाची ताकद वाढते आहे . संघ संस्थापक आद्य सरसंघचालक पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, पूजनीय गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्रसिहजी, सुदर्शनजी यांच्या पश्चात आता पूजनीय मोहनजी भागवत संघाची धुरा सांभाळत आहेत.
आमचं अहिल्यानगर शहरातील माळीवाड्यात घर होतं आणि शाखा होती, 'उद्यान शाखा ' . वाडिया पार्कच्या मैदानावर ही शाखा भरायची. वयाच्या पाचव्या वर्षापासून माझ्या काकांबरोबर शाखेत जायचो. आज विजयादशमी असल्यामुळे मला शिशू, बाल अवस्थेतील विजयादशमी उत्सवाची आठवण झाली. साहजिकच त्या बरोबर स्मरण होते ते, माझे तत्कालीन शिक्षक मधू देव यांचे. पूर्वी नावासमोर ' जी ', ' राव ' अशा उपाध्या लावल्या नाहीत तरी आदर आणि आपुलकी यत्किंचितही कमी नसायची. शाळेत शिक्षक असलेले वाघ सर, कानडे सर, धर्माधिकारी सर आमच्यासाठी बाळ वाघ आणि विजू कानडे , अरुण धर्माधिकारी होते.
तेंव्हा मधू देव डांगे गल्लीत रहायचे. त्यामुळे शाखेत जाताना, येताना आम्हाला हमखास सोबत असायची. शाखेतून चपला बर्याचवेळा गायब व्हायच्या. एकदा तर माझा शर्टच कोणीतरी घालून गेलं. मग काय, मधुकररावांच्या सायकलवरुन घरापर्यंत आबाची बनियनवर वरात निघाली होती.
साठ वर्षांपूर्वी विजयादशमी उत्सवात विविध प्रात्यक्षिके दाखविली जायची . त्यात एक आकर्षक प्रात्यक्षिक असायचे, ' जाळातील उड्या '. यात उड्या मारणार्यांमध्ये मीही एक असायचो. एकट्याने, जोडीने, एकाचवेळेस जाळाच्या आतून दोनजण आणि वरुन दोनजण एकाचवेळेस उड्या मारणे अशी विविध प्रात्यक्षिके असायची . आमची ही सगळी तयारी मधुकरराव स्वत: करुन घ्यायचे. रंगीत तालीमही व्हायची. उड्या मारणार्या स्वयंसेवकांच्या अंगावर फक्त केशरी लंगोट अथवा जांग असायचे. मुळात पांढरी असलेली ही वस्त्रे स्वत: मधुकरराव घरोघरी जाऊन रंगवून द्यायचे . पुढे त्यांची बदली पारनेर, नेवासा आदि ठिकाणी झाली. उत्तम कामामुळे, सरकारी नोकरी सांभाळून त्यांनी सतत संघ, विश्व हिंदू परिषदेच्या जबाबदार्या पार पाडल्या
कालांतराने मी देखील नोकरीच्या निमित्ताने नेवाशात आलो. मधुकररावांबरोबर पुन्हा संघकाम करण्याची संधी मिळाली. मधकररावांचे वैशिष्ट्य म्हणजे, एखादा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते जीवाचे रान करायचे पण कार्यक्रमात मात्र ते पडद्यामागेच असायचे. आळंदीचे विशाल हिंदू संमेलन, नेवाशाचा विराट हिंदू मेळावा, नेवाशाला झालेले संघाचे हेमंत शिबीर, दरवर्षी होणारे दिवाळी वर्ग, नेवाशाची संघ कार्यालय वास्तू उभारणी, या सगळ्या उपक्रमात खंबीरपणे उभा राहणारा माणूस म्हणजे मधू देव ! प्रभात शाखेत नियमित उपस्थित राहणारा, उत्कृष्ट आसने व योग करणारा स्वयंसेवक म्हणजे मधू देव ! शाखेत, बैठकीत आणि चर्चेत हसरं आणि आनंदी वातावरण निर्माण करुन, सर्वांकडून ईप्सित कामे करवून घेणारी उर्जा म्हणजे मधू देव !
अशा या देवस्वरुप मधू देवांनी शिशू अवस्थेपासूनच माझ्यावर संघाचे संस्कार केले. त्यांना जाऊन वीस एक वर्षे झाली आहेत पण त्यांचे विस्मरण होणे अशक्यच !



Post a Comment
0 Comments