Type Here to Get Search Results !

मला भेटलेले कुटुंबप्रबोधनकार : डॉक्टर खंडेलवाल शताब्दी : संघ संस्कारांची ( 9 )

 🚩🚩🚩

मला भेटलेले कुटुंबप्रबोधनकार : डॉक्टर खंडेलवाल 

शताब्दी : संघ संस्कारांची ( 9 )



        ( मान.  डॉ.  जयराम जी खंडेलवाल )

सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष लेखमाला 


( लेखक सतीश तथा आबा मुळे )

' बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ' या उक्ती प्रमाणे वागणारी माणसे समाजात फारच क्वचित दिसतात मोठी भाषणे देणारे, प्रवचन करणारे आपण सांगितल्याप्रमाणे वागतातच असे नाही. पण संघाचे काम करताना मला अशी एक विभूती भेटली की त्यांच्या दर्शनाने वरील उक्तीचे प्रमाण मिळाले.


सुमारे वीस वर्षांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी या गावात संघाच्या वर्ष प्रतिपदेच्या उत्सवासाठी मी वक्ता म्हणून गेलो होतो. या उत्सवास तत्कालीन विभाग संघचालक माननीय डॉक्टर जयरामजी खंडेलवाल हे देखील आले होते. उत्सव झाल्यावर डॉक्टरांबरोबर आम्ही काही कार्यकर्ते एका नवीन तरुण स्वयंसेवकाच्या घरी चहापानासाठी गेलो. आमच्या औपचारिक गप्पा चालू होत्या. त्याचे नुकतेच लग्न झालेले होते पण तो आपल्या आई पासून वेगळा राहत होता, हे त्या स्वयंसेवकाच्या पत्नीकडून समजले. डॉक्टरांना एवढ्यावर समाधान झाले नाही त्यांनी त्या मुलीला ," तुझा सासुबाईंशी वाद झाला आहे का ? त्या कोठे राहतात ? हे विचारले. " सासुबाईशी माझा वाद झालेला नाही पण या मायलेकांचे पटत नाही. आमच्या सासूबाई इथे जवळच राहतात ", असं त्या मुलीने सांगितले. यावर डॉक्टरांनी अतिशय मायेने त्या मुलीला सांगितले, " बाई, कधीतरी एखादे कालवण चांगले झाले की मुद्दाम सासूबाईंना घेऊन जायचे . त्यांची तब्येत वगैरे चौकशी करायची. मग बघ ,काही दिवसांनी काही फरक पडतो का." एखादे वडील आपल्या मुलीला जसे प्रेमाने सल्ला देतात तसेच डॉक्टर या स्वयंसेवकाच्या पत्नीला समजावून सांगत होते. त्यांच्या शब्दातील मार्दव अतिशय प्रभावीत करणारे होते. कुटुंब प्रबोधन हा विषय आज महत्त्वाचा वाटतो आहे पण वीस वर्षांपूर्वी डॉक्टरांनी कुटुंब प्रबोधन कसे करावे याचे प्रात्यक्षिक मला दाखवले आणि माझ्या प्रवासात , कार्यकर्त्यांच्या घरात कसा संवाद करावा यासाठी आजही मला त्याचा उपयोग होत आहे. 


प्रवासाचा दिवस ठरवला, की डॉक्टर तो पूर्ण दिवस संघाच्या कामासाठीच देत असत. यासाठी ते भल्या पहाटेच उठून स्वतःचे आवरून प्रवासासाठी बाहेर पडत आणि रात्री उशिरा घरी परतायचे. " इतक्या लवकर का जाता ?" या भाभींच्या प्रश्नावर ते सांगायचे, " मी संघासाठी ' दिवस ' देण्याचे कबूल केले आहे. ' तास ' नाही . तेव्हा पूर्ण दिवस मी संघासाठी खर्च करणार." 


मी जिल्हा सहकार्यवाह, कार्यवाह असताना आमच्या अनेक बैठका कोल्हारला डॉक्टरांच्या निवासस्थानी व्हायच्या. डॉक्टर बैठकीत अपेक्षित नसले , तरी बैठक चालू असताना कोल्हारची प्रसिद्ध भेळ आमच्या बैठकीत हमखास पोहोचायची.

त्यांच्या मुलांचं विशेषतः मुलीचे त्यांच्यावर किती प्रेम आहे याचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे . स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच ते आम्हा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांचीही काळजी अजूनही घेतात. घरी आल्यावर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी डॉक्टर हमखास बोलणारच आणि त्यांची चौकशी करणारच आणि त्यामुळे संघाच्या कार्यकर्त्याला संघाचं काम करण्यासाठी सर्व कुटुंबाचं पाठबळ मिळतं. असं आहे हे मायेचं झाड म्हणजेच डॉक्टर खंडेलवाल ! 

वंदे मातरम् l

आबा मुळे नेवासा 

14 ऑक्टोबर 2025

Post a Comment

0 Comments