🚩🚩🚩 जशास तसे : पूजनीय गोळवलकर श्रीगुरुजी
शताब्दी : संघ संस्काराची ( 11 )
विशेष लेखमाला:
मुंबईच्या प्रवासात एकदा आपले द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांची पत्रकार परिषद ठेवली होती. मान्यवर पत्रकारांना बोलावले होते. त्यात आचार्य प्र. के. अत्रे यांनाही बोलावले होते.
अत्रे आपल्या दैनिकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत टीका करायचे. आपण नेहमीच सर्वांची खिल्ली उडवतो, आज गोळवलकर गुरुजींची देखील विकेट घेऊ असा विचार करून अत्रे पत्रकार परिषदेला आले होते.
प्रश्नोत्तरे, शंकासमधान चालू असताना अत्रेनी तक्रार केली. " अहो गुरूजी, तुमच्या कार्यकर्त्यांना काही समजतं का ? "
" काय झालं ?" गुरुजींनी विचारलं.
अत्रे साहेब म्हणाले, " बघाना, मी कायम संघाला नावे ठेवतो, संघाच्या कोणत्याही कार्यक्रमाला मी जात नाही तरीही तुमचे निर्बुद्ध कार्यकर्ते मला प्रत्येक उत्सवाची, कार्यक्रमाची पत्रिका आणून देतात."
गुरुजींनी एक क्षणभर डोळे मिटले आणि अत्रे
साहेबांना म्हणाले, " आचार्य, आपण हिंदू आहोत ना ? " आचार्यांनी मान डोलावली.
गुरूजी म्हणाले, " आपण दिवाळी साजरी करतो ना ?"
" होय " अत्रे म्हणाले.
" दिवाळीच्या दिवशी आपण दिवे लावतो ना ?" गुरुजींनी शांतपणे विचारले.
माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता गुरूजी मला वेगळच काय विचारत आहेत, असा विचार करून अत्रे वैतागून ' हो ' म्हणाले.
गुरूजी पुढे बोलतच होते.
" मग एक दिवा आपण देवापाशी लावतो. एक दिवा तुळशीपाशी लावतो. एक दिवा घराच्या पुढीलदारी लावतो. एक दिवा माजघरात लावतो. एक दिवा स्वैपाकघरात चुलीपाशी लावतो. एक दिवा मागील दारी लावतो......" अतिशय शांतपणे गुरूजी सांगत होते.
आता मात्र उतावीळ झालेले अत्रे रागारागाने म्हणाले, " होय, होय, एक दिवा संडासात पण लावतो."
यावर गुरूजी अगदी शांतपणे म्हणाले, " हो ना ? संडासातही दिवा लावतोना ? निमंत्रणाचेही तसंच असतं."
टीकेचा बुमरेंग कसा उलटवायचा याचे दुसरे चांगले उदाहरण याशिवाय कोणते असेल ?
वंदे मातरम् l
आबा मुळे , नेवासा ( लेखक )
24 ऑक्टोबर 2025
7038041877



Post a Comment
0 Comments