Type Here to Get Search Results !

सण सरताच ऊसमजुरांचे तांडे कारखान्यांकडे ; राहुरीच्या प्रसाद शुगरच्या हंगामाकडे ऊसउत्पादकांचे लक्ष

दिवाळसण सरताच ऊस मजुरांचे तांडे साखर कारखान्यांकडे ; राहुरीच्या प्रसाद शुगरच्या हंगामाकडे ऊस उत्पादकांचे लक्ष



राहुरी ( प्रतिनिधी )

दिवाळी पाडवा भाऊबीज सरताच तोडणी कामगारांचे तांडे साखर कारखान्यांकडे वळू लागल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे .


 

अवेळी पाऊस अन नानाविध समस्यांचे ओझे मात्र तोडणी कामगारांच्या कायम सोबतच आहे .

दिवाळी पाडवा भाऊबीज होताच साखर कारखान्यांचे बॉयलर पेटायला सुरुवात होते . साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते . केंद्र सरकारचे साखर कारखान्यांबाबतचे धोरण कायम बदलत आलेले असताना यंदाच्या वर्षी काय असेल ? याची चर्चा होत असते .

 यंदा नगर जिल्ह्यासह सोलापूर कडील भागात मराठवाड्यातील वैजापूर , संभाजीनगर , गंगापूर तसेच जळगाव जिल्ह्यातील भडगाव , पाचोरा आदी भागातून ऊस तोडणी कामगारांचे जथेच्या जथे ट्रॅक्टर ट्रॉली जुगाड जात आहेत . 

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा सामना शेतकऱ्यांसह सर्वांनाच करावा लागत आहे . अनेक ठिकाणी अतिवृष्टी नंतर बिकट चित्र पहावयास मिळत आहे . अतिवृष्टीत उसाचेही मोठे नुकसान झालेले आहे . तरीही यंदाचा उसाचा गळीत हंगाम अनेक समस्यांना बरोबर घेऊन होणार आहे . त्यामुळे सर्वांचीच याकडे लक्ष लागले आहे .

 प्रसाद शुगर्सच्या यंदाच्या गाळप हंगामाकडे ऊसउत्पादकांचे लक्ष

 राहुरी तालुक्यातील एकमेव खाजगी साखर कारखाना असलेल्या प्रसाद शुगर ने मागील वर्षी साडेपाच लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वीरित्या गाळप केले होते .

प्रसाद शुगरचा मागील साखर उताराही बर्‍यापैकी आला होता . यंदाच्या वर्षी लवकरच प्रसाद शुगरचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे .

यंदा प्रसाद शुगर कारखाना सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करेल , अशी शक्यता साखर वर्तुळात व्यक्त केली जात आहे . प्रसाद शुगरच्या उसाच्या नोंदणी सुरू असून ऊस तोडणी कामगार कारखान्याकडे येण्यास सुरुवात झाल्याचे चर्चिले जात आहे . 

राहुरी तालुक्यात यंदाच्या वर्षी साधारणतः सात ते आठ लाख मॅट्रिक टन ऊस उपलब्ध राहण्याची साखर कारखानदार मंडळी कडून सांगण्यात येते . राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे साखर कारखाना बंद असल्याने व राहुरी तालुक्यात उसाचे उत्पादन सात ते आठ लाख मेट्रिक टन असल्याने बाहेरील अनेक साखर कारखान्यांनी राहुरीकडे दरवर्षी सारखा मोर्चा वळवलेला आहे . त्यामुळे यंदाच्या ऊस गाळप हंगामाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments