Type Here to Get Search Results !

कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी चौकशी : राहुरी कृषी विद्यापीठात ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञाच्या तक्रारीमुळे खळबळ

कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी चौकशी : राहुरी कृषी विद्यापीठात ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञाच्या तक्रारीमुळे खळबळ




राहुरी  ( विशेष वृत्त )

             देशात प्रथम क्रमांकाचे समजल्या जाणाऱ्या राहुरीच्या महात्मा फुले  कृषी विद्यापीठातील कुलगुरुपदाच्या शर्यतीतून स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला करण्यासाठी एका खोट्या चौकशीचे ससेमीरा रचण्यात आल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद अहिरे यांनी केला आहे. 



या संदर्भातील त्यांचा तक्रार अर्ज राज्यपालांकडे दाखल करण्यात आला असून, राज्यपाल कार्यालयाने ही तक्रार कृषी विभागाकडे पाठविली आहे.

डॉ. अहिरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते गेली २९ वर्षे विद्यापीठाच्या सेवेत असून, त्यापैकी १८ वर्षे प्राध्यापक आणि पाच वर्षे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. मात्र, कुलगुरू कार्यालयाने राज्यपालांकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या विरोधात हेतुपुरस्सर चौकशी सुरू केली.

चौकशी समितीने विद्यापीठाकडे अहवाल सादर केला असून, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नियमानुसार एक वर्षाच्या आत चौकशी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तरीही, गेल्या दहा महिन्यांपासून अहवाल मुद्दाम रखडवून ठेवण्यात आला आहे,” असे डॉ. अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ.  अहिरे यांच्या तक्रारीनुसार  मी कुलगुरूपदासाठी अर्ज केलेला असताना मला कुलसचिवांनी दक्षता प्रमाणपत्र (व्हिजिलन्स सर्टिफिकेट) दिले. परंतु या प्रमाणपत्रात ‘माझ्याविरुद्ध चौकशी प्रलंबित आहे’ असे नमूद करण्यात आले. त्यामुळे माझ्या प्रगतीवर गदा आली असून, ही चौकशी प्रक्रिया बंद करण्याचे आदेश द्यावेत,” अशी मागणी डॉ. अहिरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.


राज्यपालांचे अव्वल सचिव विकास कुलकर्णी यांनी हा तक्रार अर्ज कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठविला आहे.  राज्यपालांकडे आलेली तक्रार पुढील कार्यवाहीसाठी आपणाकडे सुपूर्त करण्यात आली आहे, असे पत्रात नमूद आहे.

 दरम्यान, डॉ. अहिरे यांनी कृषी सचिवांना प्रत्यक्ष भेटून आपली बाजू मांडली असून, यामुळेच त्यांना कुलगुरूपदाच्या प्राथमिक उमेदवार यादीत स्थान मिळाल्याचे सांगितले जाते .

Post a Comment

0 Comments