सेवाभावातून वयोवृद्धांना नवसंजीवनी ; ब्राह्मणी येथे वयोश्री योजनेतंरत आरोग्य तपासणी व मोफत सहाय्यक साधन शिबिर संपन्न
ब्राह्मणी : ( प्रतिनिधी )
समाजसेवेचा अखंड ध्यास आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्य व स्वावलंबनासाठीची बांधिलकी जपत, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन,
अहिल्यानगर संचलित प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र यांच्या वतीने ‘वयोश्री योजना’ अंतर्गत दोन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी व सहाय्यक साधन वितरण शिबिर नुकतेच ब्राह्मणी येथे यशस्वीपणे पार पडले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार), अॅलिम्को, कानपूर आणि ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २ व ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरादरम्यान एकूण ७२१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ते ‘वयोश्री योजना’चे पात्र लाभार्थी ठरले आहेत. या लाभार्थ्यांना व्हीलचेअर, कमोड चेअर, श्रवणयंत्र, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा, मानपट्टा, काठी इत्यादी विविध सहाय्यक साधनांचे विनामूल्य वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या साधनांची एकूण अंदाजित किंमत ₹ ४७,१३,२३८ इतकी आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मा. खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र हे पुन्हा एकदा समाजसेवेचे आदर्श उदाहरण ठरले आहे. या केंद्रामार्फत दररोज अनेक वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सल्ला, वैद्यकीय मदत आणि सहाय्यक साधनांची सुविधा पुरविली जाते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत ब्राह्मणीचे सरपंच सुरेश मानकर तसेच अॅलिम्को, कानपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. या योजनेमुळे वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि स्वाभिमानाचे तेज पुन्हा झळकले.
“सेवाभावातून समाजसेवा” हे ब्रीद जपत,
डॉ. विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर यांनी
वयोवृद्ध नागरिकांसाठी पुन्हा एकदा
‘आशेचा किरण’ निर्माण केला आहे.




Post a Comment
0 Comments