Type Here to Get Search Results !

लोणी येथे ‘प्रभूमिलन भवन’चे दिमाखात उद्घाटन; अध्यात्म, शांतता आणि मूल्यसंस्कारांचे उभारले नवे केंद्र

 लोणी येथे ‘प्रभूमिलन भवन’चे दिमाखात उद्घाटन; अध्यात्म, शांतता आणि मूल्यसंस्कारांचे उभारले नवे केंद्र



लोणी (प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर साबळे

लोणी, ता. राहाता  ब्रह्मकुमारीज ओम शांति केंद्र, लोणी बुद्रुक यांच्या उपक्रमातून साकारलेल्या

‘प्रभूमिलन भवन’ या भव्य, शांततादायी आणि आधुनिक सुविधांनी युक्त आध्यात्मिक केंद्राचे दिमाखदार उद्घाटन शनिवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

भवनाचे लोकार्पण अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच संयुक्त प्रशासिका ब्रह्मकुमारीज राजयोगिनी संतोष दिदीजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राजयोगिनी सुनंदा दिदीजी, राजयोगिनी नलिनी दिदीजी, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा. आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पा. यांनीही उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.



उद्घाटनावेळी संपूर्ण परिसर आकर्षक फुलसजावटीने सजला होता. शांततेचा संदेश देणारे प्रसन्न संगीत आणि मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांच्या उपस्थितीने वातावरण आध्यात्मिकतेने भरून गेले होते. ‘प्रभूमिलन भवन’ उभारण्यामागे समाजात सकारात्मक विचारसरणी, मानसिक स्थैर्य, आत्मिक शक्ती आणि मूल्याधारित जीवनशैली रुजविण्याचे ध्येय असल्याचे उद्घाटन सोहळ्यात प्रकर्षाने जाणवले.

उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “प्रभूमिलन भवन ही केवळ एक इमारत नाही, तर समाजाला शांतता, सद्भावना आणि योग्य दिशा देणारे केंद्र आहे. आधुनिक जगात वाढत्या मानसिक तणावात अध्यात्म हा मनाला उभारी देणारा आणि आयुष्य समतोल ठेवणारा मार्ग आहे. अशा केंद्रांमुळे युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना मनःशांतीचा आधार मिळू शकतो.”

राजयोगिनी संतोष दिदीजी म्हणाल्या, “या केंद्रात येणाऱ्यांना राजयोग साधना, ध्यान आणि सकारात्मक विचारसरणीचा अनुभव मिळेल. प्रभूमिलन भवनातून शांतता, आत्मिक ऊर्जा आणि मनःशांतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल. आत्मज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो.” राजयोगिनी नलिनी दिदीजींनी जलदगती जीवनशैलीमुळे वाढलेल्या मानसिक अस्थिरतेवर भाष्य करत ध्यानयोगाचे महत्व स्पष्ट केले. ध्यान केवळ अध्यात्मिक नव्हे तर मानसिक आरोग्य सुधारण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.

शांतीवन, माउंट आबू येथील राजयोगी भानुप्रकाश भाईंनी ब्रह्मकुमारीजच्या जागतिक सेवाविस्ताराची माहिती दिली. ते म्हणाले, “आत्मिक शांतता मिळवण्यासाठी बाह्य साधनांची नव्हे तर अंतर्मनाच्या शुद्धतेची गरज असते. प्रभूमिलन भवन हे त्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे.”

कार्यक्रमात माजी खा. सुजयदादा विखे, सौ. सुवर्णाताई विखे, सौ. धनश्रीताई विखे, सौ. कल्पनाताई मैड, राजयोगी उषा दिदीजी, राजयोगी दशरथभाईजी, जनार्दन पा. घोगरे, राजेशभाई यांच्यासह परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रभूमिलन भवनाच्या उभारणीबद्दल समाधान व्यक्त करत हे केंद्र लोणी आणि परिसरात आध्यात्मिकतेची नवी दिशा देईल, अशी भावना व्यक्त केली.

उद्घाटनानंतर भाविकांनी भवनातील विविध सुविधा पाहिल्या. शांत ध्यानकक्ष, ग्रंथालयातील आध्यात्मिक साहित्यसंपदा, आधुनिक सभा हॉल, प्रशिक्षण व शिक्षणासाठी उपलब्ध उत्तम व्यवस्था पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून केंद्राची लोकप्रियता अधोरेखित झाली.

या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मकुमारीज ओम शांति केंद्रातील सेवाभावी भाई–बहीण यांनी अतिशय निस्वार्थी सेवाभावाने केले. लोणी सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी आशा दिदी, उमा दिदी, गायत्री दिदी, ब्रह्माकुमार राजेशभाई तसेच संपूर्ण लोणी ईश्वरीय परिवाराने एकजुटीने मेहनत घेतली. संपूर्ण परिसरात शांतता, पवित्रता आणि भक्तिभावाचे वातावरण जाणवत होते.

आगामी काळात ‘प्रभूमिलन भवन’मधून विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षण कार्यक्रम, मूल्याधारित उपक्रम, राजयोग प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, ध्यानसत्रे, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

उपस्थित भाविकांच्या भावना आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनातून स्पष्ट झाले की ‘प्रभूमिलन भवन’ लोणीची आध्यात्मिक ओळख अधिक दृढ करणारे ठरेल. मानसिक शांती, मूल्यसंस्कार आणि सद्भावनेचा दीप सतत प्रज्वलित ठेवण्याचे कार्य हे केंद्र येणाऱ्या अनेक वर्षे सातत्याने करत राहील.

Post a Comment

0 Comments