Type Here to Get Search Results !

नीतिमत्तेच्या बळावर पत्रकार घडतो ; पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद कटिबद्ध - मधुसुदन कुलथे

नीतिमत्तेच्या बळावर पत्रकार घडतो ; पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद कटिबद्ध - मधुसुदन कुलथे



लोणी ( प्रतिनिधी ) - ज्ञानेश्वर साबळे

प्निर्भीड, प्रामाणिक व जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित जपणे हीच पत्रकारांची खरी ओळख असून, पत्रकारांच्या प्रश्नांना एकसंघपणे वाचा फोडण्यासाठी संघटन बळकट करणे काळाची गरज आहे .



पत्रकारांच्या आडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद सातत्याने प्रयत्न करीत असून,



भविष्यात पत्रकारांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे समोर ठेवून परिषद कार्य करणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्य मराठी पत्रकार परिषद केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी केले.


राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश व अहिल्यानगर पत्रकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने संवाद वाढविणे, संघटन बळकटी साधणे तसेच आगामी काळातील उपक्रमांची दिशा ठरविण्यासाठी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पत्रकारांच्या सद्यस्थितीवर, त्यांच्या दैनंदिन अडचणींवर, सामाजिक व आर्थिक समस्यांवर तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.


आज बदलत्या काळात पत्रकारांना अनेक आडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक असुरक्षितता, नियमित उत्पन्नाचा अभाव, आरोग्यविषयक सुविधा नसणे, विमा संरक्षणाचा प्रश्न, काम करताना सुरक्षिततेची हमी नसणे, तसेच शासन स्तरावर योग्य तो सन्मान व सुविधा मिळत नसणे, अशा विविध समस्या पत्रकारांसमोर उभ्या आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांना तर या अडचणी अधिक तीव्रतेने भेडसावत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या सर्व प्रश्नांची दखल घेत राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी ठोस उपाययोजना राबविणार असल्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


या बैठकीत शहाजी सुखदेव दिघे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पत्रकार हा समाजाचा एक महत्त्वाचा स्तंभ असून लोकशाहीचा चौथा आधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र प्रत्यक्षात पत्रकारांना आवश्यक त्या सेवा-सुविधांचा व संरक्षणाचा अभाव आजही जाणवतो. अनेक पत्रकार आर्थिक, सामाजिक व सुरक्षिततेच्या समस्यांशी झुंज देत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, विमा संरक्षण, निवास योजना, आर्थिक सक्षमीकरण व आपत्कालीन मदत यासारख्या बाबी प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पत्रकारांच्या आडीअडचणी केवळ मांडून थांबणे नव्हे तर त्या सोडविण्यासाठी ठोस कृती करणे हे परिषदेचे धोरण आहे. पत्रकारांना मान-सन्मान मिळावा, त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जावी व सुरक्षित वातावरणात काम करता यावे, यासाठी संघटना सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. संघटन मजबूत झाल्यास पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता येतील, हा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


राज्य मराठी पत्रकार परिषद आज महाराष्ट्रभर विस्तारली असून, ग्रामीण ते शहरी भागातील मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेत सहभागी होत आहेत. वाढत्या सदस्यसंख्येमुळे पत्रकारांच्या हक्कांसाठी एकत्रित लढा उभारण्याची ताकद निर्माण झाली आहे. आगामी काळात पत्रकार भवन उभारणी, प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शन, तसेच विविध कल्याणकारी योजना राबविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने बँक स्थापनेचा विचार हा दीर्घकालीन पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या प्रसंगी डॉ. तान्हाजी रावजी लामखडे (मामा) – केंद्रीय संघटक, प्रशांत रावसाहेब टेके पाटील – प्रदेश संपर्कप्रमुख, तसेच शहाजी सुखदेव दिघे – जिल्हाध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार परिषद अहिल्यानगर आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रदेश संपर्कप्रमुख प्रशांत रावसाहेब टेके पाटील यांनी पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. संघटनेच्या माध्यमातूनच पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


एकंदरित, ही बैठक केवळ संघटनात्मक न राहता पत्रकारांच्या भवितव्यासाठी दिशादर्शक ठरली. पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी व सुरक्षित भविष्यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद अधिक जोमाने कार्य करणार असून, पत्रकारांच्या आडीअडचणी सोडविण्यासाठी संघटना सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments