Type Here to Get Search Results !

आणीबाणी नंतर भास्करराव ब्रह्मनाथकर यांची शेवगाव व नेवासा तालुक्यात.....

 🚩🚩🚩 आणीबाणी नंतर भास्करराव ब्रह्मनाथकर यांची शेवगाव व नेवासा तालुक्यात.....

आणीबाणीचे ते दिवस


सतर्क खबरबात जिल्ह्याची - ( विशेष वृत )

      सतीश बाळकृष्ण मुळे ( आबा मुळे )

                ( प्रस्तूत लेखमालेचे लेखक )



शताब्दी संघ संस्कारांची ( 25 )

25 जून 1975. भारतीय लोकशाहीतील एक काळा दिवस. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली आणि त्यांच्या हजारो विरोधकांना रात्रीतून मिसाबंद केले. काहीही संबंध नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली.

 पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासह संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनाही तुरुंगात डांबले. काहीकाळ वाट पाहून आणीबाणी विरोधात आणि संघ बंदी विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्याग्रह पर्व सुरू केले. हे पर्व सुरु केले नसते तर, लोकांनी आणीबाणी स्वीकारली असेच चित्र निर्माण केले गेले असते. आणीबाणी आणखी किती दिवस चालू राहिली असती ते फक्त इंदिराबाईंनाच ठाऊक झाले असते. 

सत्याग्रह हाणून पाडण्यासाठी दुराचारी शासनाने आणि पोलीस खात्याने दमनचक्र चालू केले. पण हजारो संघ स्वयंसेवकांनी पोलिसांच्या क्रूर कृत्यांना न जुमानता लढा चालूच ठेवला. देशभरातील तुरुंग भरून गेले पण सत्याग्रह चालूच होते. तुरुंगात जागा नाही म्हणून माझ्यासारख्या शेकडो स्वयंसेवकांना महिना - दोन महिने तुरुंगात ठेवून सोडून दिले जात होते. 


50 वर्षापूर्वी नांदेडचा एक तरुण आपल्या मित्राला घेऊन आणीबाणी विरोधात रस्त्यावर उतरला. भास्करराव ब्रह्मनाथकर हे त्याचे नाव. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याच गावात विरोध कसा सहन होणार ? पोलिसांनी इंग्रजांच्या जुलुमशाहीला वरताण ठरेल असा भास्कररावांचा अतोनात छळ केला.

 शासन हरले पण भास्करराव हरले नाहीत. भारतभरातील एकही सत्याग्रही पोलिसी अत्याचारापुढे नमला नाही. देशातील कानाकोपऱ्यात सत्याग्रह होत राहिले. अखेर इंदिरा शासनाला गुढघे टेकावे लागले. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि जनता सरकारने आणीबाणी उठवली. सर्वांची कारावासातून सुटका झाली.

आणीबाणी नंतर भास्करराव ब्रह्मनाथकर यांची शेवगाव व नेवासा तालुक्यात.....

आणीबाणी नंतर भास्करराव ब्रह्मनाथकर संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. नगरवासीयांच्या सुदैवाने त्यांची नियुक्ती नगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्याचे प्रचारक म्हणून झाली. त्यामुळेच या महापराक्रमी माणसाशी 

माझा परिचय झाला.


आज सुमारे 50 वर्षांनंतर भास्कररावांनी आणीबाणीबद्दलच्या अनुभवावर आधारित लिखाण करून नव्या पिढीला सहज समजेल अशा पद्धतीने आणीबाणी आणि तिला लोकांनी केलेला सक्रिय विरोध समजावून सांगितला आहे.

 असे हे " आणीबाणीचे ते दिवस " या नावाने प्रकाशीत झालेले पुस्तक नेवाश्यातील ज्येष्ठ ( 50 वर्षापूर्वी तरुण असलेल्या ) स्वयंसेवकांना भेट देण्यासाठी 75 वर्षांचे भास्करराव स्वतः नुकतेच नेवाश्यास येऊन गेले. दुर्भाग्यवश मी प्रवासात बाहेरगावी होतो. त्यामुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. तथापि माझ्या सूनबाई सौ. संचिता मात्र घरी असल्यामुळे, भास्कररावांचे चरण ' सुदर्शनस्पर्श ' ला लागले. धन्यवाद भास्करराव !


आणीबाणी म्हणजे दुसरा स्वातंत्र्याचा लढाच होता. पुढील पिढ्यांना माहिती होण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात या लढ्याची सविस्तर मांडणी व्हावी अशी इच्छा सर्वत्र व्यक्त होत आहे. शासन याची दखल घेईल अशी अपेक्षा.

वंदे मातरम् l

आबा मुळे नेवासा 7038041877

वर्षप्रतिपदा शके 1948

19 मार्च 2026

Post a Comment

0 Comments