Type Here to Get Search Results !

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची शिवसैनिकांची आग्रही मागणी

 राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची शिवसैनिकांची आग्रही मागणी



​राजूभाऊ शेटे पाटील व रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वावर पदाधिकाऱ्यांचा विश्वास; तिसऱ्या पर्यायासाठी शिवसैनिक सज्ज

​राहुरी ( प्रतिनिधी )

"आजपर्यंत आपण इतरांना आमदार करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर प्रस्थापित राजकारणी सर्वसामान्यांचे प्रश्न विसरून स्वतःचे हित जोपासण्यात धन्यता मानतात. गेल्या काही निवडणुकांचा अनुभव पाहता, आता राहुरी मतदारसंघात सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे.

 जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या आग्रहाखातर तिसरा सक्षम पर्याय देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने निश्चित विचार केला जाईल," असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते राजूभाऊ शेटे पाटील यांनी केले.

​याप्रसंगी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, "या निवडणुकीत शिवसैनिक घेतील तीच 'पूर्व दिशा' ठरणार आहे. प्रस्थापित राजकारण्यांमुळे राहुरी मतदारसंघाची 'विकासगंगा' थांबली असून, सामान्य शेतकरी व नागरिक उपेक्षित आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच या मतदारसंघाचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे शिवसैनिकांनी आतापासूनच गावागावात कामाला लागावे."

​बैठकीचा सविस्तर वृत्तांत:

मंगळवार दि. २४ रोजी राहुरी येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

​ह.भ.प. संपत महाराज जाधव (जिल्हाप्रमुख, आध्यात्मिक आघाडी): "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद निर्माण झाली आहे. सामान्य कुटुंबातील उमेदवारच या विधानसभेचा विकास करू शकतो."

​ॲड. भाऊसाहेब पवार: "राहुरी कारखाना निवडणुकीत जनतेने राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आता विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी तरुण वर्ग सज्ज आहे."

​धीरज पानसंबळ: "ही निवडणूक हातात घेतल्यास आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी देखील पूर्ण होईल."

यावेळी राहुरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन निवेदक महेंद्र उगले यांनी केले तर आभार युवा सेना ता. प्रमुख सचिन करपे यांनी मानले.



*​चौकट:संजीव भोर पा. व ​बाबुशेठ टायरवाले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे साकडे*

राहुरी विधानसभा लढविण्याबाबतची शिवसैनिकांची ही भावना शिवसेना राज्य प्रवक्ते तथा सहसंपर्क प्रमुख संजीव भोर पा. व शिवसेना नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या माध्यमातून मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. पक्षादेशाप्रमाणे पुढील रणनीती ठरवली जाईल, अशी माहिती देवेंद्र लांबे पाटील (शिवसेना, राहुरी तालुका प्रमुख) यांनी दिली.

Post a Comment

0 Comments